सिंहस्थासाठी भूसंपादनाला वेग
नुकसानभरपाईची मागणी तातडीने सादर करण्याचे निर्देश
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ७ : आगामी नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर साधुग्राम, अंतर्गत व बाह्य वाहनतळ, होल्डिंग एरिया, हेलिपॅड तसेच अन्य सुविधांसाठी प्रस्तावित जमिनींच्या भूसंपादन प्रक्रियेला वेग देण्याचे निर्देश सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाने संबंधित यंत्रणांना दिले आहेत. अधिग्रहित जमिनींच्या मालकांना देय नुकसानभरपाईची मागणी तातडीने सादर करून पुढील कार्यवाही करण्याची सूचना करण्यात आली आहे.
सिंहस्थ कुंभमेळा २०२७ साठी विविध पायाभूत सुविधा उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी आवश्यक जमिनींचे अधिग्रहण करून जमीनमालकांना देय नुकसानभरपाई निश्चित करणे आवश्यक आहे. प्रस्तावित क्षेत्रासाठी संबंधित अधिग्रहण संस्थेकडून नुकसानभरपाईची मागणी करण्यात आली असली, तरी त्यावर अद्याप कार्यवाही झालेली नसल्याचे प्राधिकरणाने निदर्शनास आणून दिले आहे.
महाराष्ट्र जमीन अधिग्रहण कायद्यातील तरतुदींनुसार आवश्यक नुकसानभरपाईची मागणी तातडीने प्राधिकरणाच्या नियोजन शाखेकडे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. भूसंपादनाची प्रक्रिया वेळेत पूर्ण करून कुंभमेळ्याच्या पायाभूत सुविधांच्या कामांना अडथळा येऊ नये, यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत.
कुंभमेळा आयुक्त कार्यालयाने नाशिक महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस प्रशासन, जिल्हाधिकारी कार्यालय तसेच संबंधित प्रांत व तहसील कार्यालयांना याबाबत कळवून आवश्यक कार्यवाहीचे निर्देश दिले आहेत. सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाचे अतिरिक्त कुंभमेळा आयुक्त कमलाकर रणदिवे यांनी यासंदर्भातील पत्र जारी केले आहे.