नाफेडने नेमलेल्या संस्थेच्या सहभागामुळे लासलगावला कांदा लिलाव ठप्प

Lasalgaon onion auction stalled
Lasalgaon onion auction stalledSakal
Summary

विंचूर येथील संस्था लासलगाव बाजार समितीची परवानाधारक आहे. पण, लासलगाव व्यापारी असोसिएशनची सभासद नसल्याचे कारण देत व्यापारी वर्गाच्या आडमुठे धोरणामुळे कांद्याचे लिलाव दुपारपर्यंत ठप्प झाले.

लासलगाव (जि. नाशिक) : लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गुरुवारी (ता. ३) ‘नाफेड’कडून (NAFED) कांदा खरेदीसाठी नेमलेल्या विंचूरच्या कृषी साधना शेतमाल उत्पादक सहकारी संस्थेने लिलाव प्रक्रियेत सहभाग घेतला. त्यास लासलगाव व्यापारी वर्गाने विरोध दर्शवत लिलाव प्रक्रियेतून काढता पाय घेतल्याने सकाळच्या सत्रातील लिलाव बंद पडले. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड हाल झाले. (Lasalgaon onion auction stalled due to organization appointed by NAFED participated in the auction)

विंचूर येथील संस्था लासलगाव बाजार समितीची परवानाधारक आहे. पण, लासलगाव व्यापारी असोसिएशनची सभासद नसल्याचे कारण देत व्यापारी वर्गाच्या आडमुठे धोरणामुळे कांद्याचे लिलाव दुपारपर्यंत ठप्प झाले. या वेळी कांदा लिलाव पूर्ववत सुरू करण्याच्या मागणीला लासलगाव बाजार समितीने काही काळ शेतकऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे शेतकरी वर्गात प्रचंड संताप निर्माण झाला. दरम्यान, दुपारी साडेतीनला लिलाव प्रक्रियेला सुरवात झाली.

दरम्यान, आम्हालाही नाफेडने कांदा खरेदीची परवानगी दिल्याचे ‘वेफको’ या संस्थेने कळवले. यावर बाजार समितीने वेफको व विंचूर येथील संस्थेला कागदपत्रांची पूर्तता करण्यास सांगून ज्याला परवानगी दिली असेल, त्या संस्थेला लिलाव प्रक्रियेत सहभाग घेता येईल, यावर तोडगा निघाल्याने व्यापाऱ्यांनी दुपारच्या सत्रात लिलाव सुरू झाले.

गेल्या वर्षी केंद्र सरकारने आधारभूत किंमत योजनेंतर्गत ४ मे २०२० ला ५ ऑगस्टपर्यंत ३१ हजार ६९४ क्विंटल कांदा खरेदी केला होता. हा कांदा कमीत कमी ५३२ रुपये, जास्तीत जास्त एक हजार १८७ रुपये, तर सरासरी ९५० रुपये दराने खरेदी केला होता. मात्र, कोरोनाच्या दुसऱ्‍या लाटेमुळे ही योजना तब्बल एक महिना उशिराने सुरू झाल्याने गुरुवारी (ता. ३) लासलगाव बाजार समितीत केवळ दोन वाहनांतून कांदा खरेदी करून जास्तीत जास्त दोन हजार ५८ व कमीत कमी एक हजार ८०० रुपये दराने कांदा खरेदी केला गेला.

दरम्यान, बाजार समिती आवारात एक हजार ४०० वाहनांतून सकाळी अकरापर्यंत एक हजार ५७ वाहनांचे लिलाव झाले. कमीत कमी ७०० रुपये, जास्तीत जास्त दोन हजार १३१, तर सरासरी एक हजार ८०० रुपये दर मिळाला होता.

लासलगाव बाजार समितीत कोणत्या ना कोणत्या कारणाने शेतकऱ्यांचे वांधे होते. ‘नाफेड’ने खरेदीची परवानगी दिलेल्या विंचूर येथील संस्थेने खरेदी सुरू केल्याने व्यापाऱ्यांनी काढता पाय घेतला व प्रक्रिया बंद पाडली. यामुळे शेतकऱ्यांना दोन पैसे मिळणार असतील, तर व्यापाऱ्यांच्या पोटात दुखायला नको, उलट सहकार्य करायला हवे.

- पंकज जाधव, कांदा उत्पादक शेतकरी

लासलगाव बाजार समितीचे परवानाधारक असलेल्या विंचूर येथील संस्था व वेफको यांनी खरेदी परवानगी असल्याची कागदपत्रे सादर करावी. तोपर्यंत लिलाव प्रक्रियेत सहभागी होता येणार नाही. यावर गुरुवारी दुपारपर्यंत बंद पडलेले कांदा लिलाव दुपारच्या सत्रात सुरू करण्यात आले.

- नरेंद्र वाढवणे, सचिव, बाजार समिती, लासलगाव

लासलगाव बाजार समितीत सभापती व उपसभापती महिला असल्याने एका महिला खरेदीदाराकडे बाजार समितीचा परवाना असूनही गळचेपी होत आहे. व्यापाऱ्यांनी केवळ असोसिएशनचे सभासद नसल्याचे कारण देत लिलावातून काढता पाय घेतला. यावर आपण वरिष्ठांना कळविणार आहोत.

- साधना जाधव, कृषी साधना संस्था, विंचूर

(lasalgaon onion auction stalled due to organization appointed by NAFED participated in the auction)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com