बिबट्याच्या हल्ल्यात
पातोंड्यात वासरू ठार
पातोंडा (ता. चाळीसगाव) ः परिसरात गेल्या काही दिवसांपासून शेत शिवारांमध्ये बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. गुरुवारी (ता. १२) येथील मनोज माळी यांच्या शेतातील गोठ्यावर बांधलेल्या वासरावर बिबट्याने हल्ला करून त्याला ठार केले. दोन दिवसांपूर्वी दोन वासरांचा बिबट्याने फडशा पाडला होता. दोन दिवसात तीन वासरांचा बळी गेल्याने शेतकऱ्यांसह पशुपालक धास्तावले आहेत. बिबट्याच्या भीतीमुळे शेतात जाण्यास मजूर धजावत नाही. वन विभागाने या भागात पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.
--------------------
चाळीसगाव स्थानकात
प्रवाशांची गर्दी वाढली
चाळीसगाव ः येथील आगारात सध्या दिवाळी पाडवा व भाऊबीजनिमित्त गावी जाणाऱ्या प्रवाशांची चांगलीच गर्दी होत आहे. दररोज साधारणतः ३० हजार किलोमीटर बसेस धावत असून साधारणतः ११ ते १२ लाखांचे रोजचे उत्पन्न होत आहे. दिवाळीचा सण नुकताच झाल्याने होणारी गर्दी लक्षात घेऊन प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी आगार व्यवस्थापक सुहास कोळपकर, वाहतूक निरीक्षक पूजा घाडगे, प्रयास पाटील, कार्यशाळा अधीक्षक नीलेश कोतवाल यांच्यासह सर्व कर्मचारी दिवसभर आगारात थांबून असतात. सध्या आगारात होणारी गर्दी लक्षात घेता, प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलिस प्रशासनाने जास्तीचे कर्मचारी नियुक्त करावेत, अशी मागणी होत आहे.
--------------------
लोहारा येथे चारा
बियाणाचे वाटप
लोहारा (ता. पाचोरा) ः सध्याच्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जनावरांना हिरवा चारा उपलब्ध व्हावा, यासाठी येथील पशुवैद्यकीय दवाखान्यांतर्गत शेतकऱ्यांना अनुदानावर चारा बियाण्याचे नुकतेच वाटप करण्यात आले. सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांना प्रत्येकी शंभर रुपये अनुदानावर हे बियाणे वितरित करण्यात आले. यावेळी तालुका पशुसंवर्धन अधिकारी डॉ. अंकुश ढोन, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. नंदकिशोर पंचलिंगे, ग्रामपंचायत सदस्य कैलास चौधरी, माजी सरपंच अमृत चौधरी, किरण पाटील, प्रकाश पाटील, गुणवंत पाटील, ज्ञानेश्वर पाटील, पशुधन पर्यवेक्षक प्रमोद जाधव आदी उपस्थित होते.
------------------------पूर्ण