05218
आसखेडा : रविकांत कापडणीस यांच्या विहीरीतून सुखरूप बाहेर काढण्यात आलेला बिबट.
आसखेडा येथे विहिरीत पडलेल्या
बिबट्याची वनविभागाकडून सुटका
सकाळ वृत्तसेवा
अंबासन, अंतापूर, ता. १८ : आसखेडा (ता.बागलाण) येथे भक्ष्याचा पाठलाग करताना विहिरीत पडलेल्या बिबट्याची वनविभागाच्या पथकाने यशस्वी सुटका केली. वनविभागाच्या तत्परतेमुळे बिबट्याचे प्राण वाचले असून, या घटनेमुळे परिसरातील शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आसखेडा येथील शेतकरी रविकांत बंडू कापडणीस यांच्या मालकीच्या (गट क्रं.६५) मधील विहिरीत रात्रीच्या सुमारास भक्ष्याचा पाठलाग करताना बिबट्या पडला होता. सकाळी शेतातील विद्युतपंप सुरू करण्यासाठी गेलेल्या सालगड्याने विहिरीत डोकावून पाहिले असता त्याला बिबट्या पडल्याचे निदर्शनास आले. त्याने तत्काळ ही माहिती रविकांत कापडणीस यांना भ्रमणध्वनीद्वारे दिली. त्यानंतर वनविभागाला घटनेची माहिती देण्यात आली.
वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. कर्मचाऱ्यांनी योग्य नियोजन व अथक प्रयत्नांच्या सहाय्याने विहिरीत पिंजरा सोडून बिबट्याची सुरक्षित सुटका केली. बचाव मोहीम ज्ञानेश्वर शेरमाळे, वनपरिक्षेत्र अधिकारी, ताहाराबाद प्रादेशिक यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. या मोहिमेत वनरक्षक व्ही. डी. पवार, एस. एस. गायकवाड तसेच वनमजूर केदा भामरे, लक्ष्मण पवार, दीपक पवार व अनिल पवार यांनी सहभाग घेतला. आसखेडा परिसरात आणखी बिबट्याचा वावर असल्याची शक्यता व्यक्त होत असल्याने शेतकरी व ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. नागरिकांनी शेतात जाताना सतर्कता बाळगावी, असे आवाहन करण्यात येत आहे.