मेन फिचर
दुष्काळामुळे बिबट्यांचा वावर नागरी वस्तीकडे
--------------------------------------
वनविभागाकडून आधीक सजग उपाययोजनांची गरज
सकाळ वृत्तसेवा
सटाणा, ता. २२ : पूर्वीपासूनच वाघांच्या अधिवासाचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या बागलाण तालुक्यात सहा महिन्यांपासून बिबट्यांचा वाढता अधिवास नागरिकांसाठी जीवघेणा ठरत आहे. डोंगरदऱ्या, जंगलक्षेत्र आणि शेतीशिवारात संचार करणाऱ्या बिबट्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
बिबट्या आणि माणूस यांच्यातील वाढता संघर्ष हा केवळ वन्यजीवांचा प्रश्न नसून, निसर्ग आणि मानव यांच्यातील बिघडत चाललेल्या सहजीवनाचा गंभीर इशारा आहे.
बागलाण तालुक्याला निसर्गसंपन्नतेचा वारसा लाभला आहे. डोंगररांगा, वनक्षेत्र, शेतशिवार आणि पाणवठ्यांमुळे अनेक वन्यजीवांना येथे नैसर्गिक अधिवास मिळतो. मात्र, वनक्षेत्रातील बदल, वाढते नागरीकरण यामुळे मानवी वस्त्यामुळे संर्घष वाढत चालला आहे.शेतकरी, शेतमजूर, पशुपालक आणि दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या नागरिकांत भीतीचे वातावरण वाढत आहे.
द्वेष नको उपाय हवा.
बिबट्या हा निसर्गसाखळीतील महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे त्याला शत्रू मानून त्याच्याविषयी द्वेष निर्माण करणे हा उपाय नाही; त्याचवेळी नागरिकांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करणेही योग्य ठरणार नाही. वनविभागाने संवेदनशील क्षेत्रांची पाहणी, बिबट्यांच्या वावराची नोंद, नागरिकांना वेळेवर सूचना देणारी यंत्रणा आणि जनजागृती यांना प्राधान्य देण्याची गरज आहे. वन्यजीवांच्या अधिवासाचे संरक्षण आणि मानवी वस्त्यांमधील सुरक्षितता यांचा समतोल साधण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना आवश्यक आहेत. निसर्गाचे रक्षण आणि मानवी जीविताची सुरक्षा या परस्परविरोधी गोष्टी नाहीत. शास्त्रीय उपाययोजना, प्रभावी वनव्यवस्थापन आणि नागरिकांचा सहभाग यांच्या माध्यमातूनच बागलाणमध्ये मानव आणि वन्यजीव यांच्यातील संघर्ष कमी करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. अन्यथा बिबट्याच्या भीतीची सावली केवळ शेतशिवारापुरती मर्यादित न राहता संपूर्ण ग्रामीण जीवनावर पडण्याची शक्यता आहे.
चौकट-
तालुक्यातील वनपरिक्षेत्र -
सटाणा : वनपरिक्षेत्रनिहाय क्षेत्रफळ (हेक्टर)
* कुपखेडा – २२२८.६२ हेक्टर
* ब्राह्मणगाव – २५३२३.२७ हेक्टर
* कऱ्हे – २०८८.०४ हेक्टर
* विरगाव आव्हाटी – २२२७७.७६ हेक्टर
* केरसाणे – १५८२.२२ हेक्टर
* डांगसौंदाणे – १११२.१० हेक्टर
* तिळवण – २२७९.५०५ हेक्टर
* खमताणे – २००९.५३ हेक्टर
* केळझर – ३९१२.५८ हेक्टर
* मळगाव खुर्द – ३२५४.५८ हेक्टर
कोट
नागरिकांच्या मागणीनुसार वनविभाग प्रशासन योग्य त्या ठिकाणी पिंजरे लावण्यास प्रशासन टाळाटाळ करते. बिबट्यांबाबत माहिती देऊनही तातडीची उपाययोजना केली जात नाही. ठेंगोडा तालुका बागलाण येथे बिबट्याच्या हल्ल्यात महिलेचा बळी गेला. बिबट्याला पकडण्यासाठी लावलेल्या पिंजऱ्यात मांस ठेवण्यात प्रशासनाचा हलगर्जीपणा कारण ठरला. वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवरच शंका येते.
-राजेंद्र सोनवणे (अध्यक्ष बागलाण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस)