(सूचना : या बातमीचा फोटो शहर टुडे तीनला सोडला आहे.)
NSK26H35187
जळगाव : लेवा संघटन अभियान समन्वय समिती आयोजित गटचर्चेत सहभागी आमदार एकनाथ खडसे, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, माजी आमदार शिरीष चौधरी आदी.
------
लेवा समाजाच्या एकजुटीसाठी जळगावात विचारमंथन
--------
‘सकल लेवा संघटन-समृद्धीच्या दिशा’ गटचर्चेसह आंतरप्रवाह विवाह सत्कार
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १७ : लेवा संघटन अभियान समन्वय समितीच्या वतीने आयोजित आंतरप्रवाह विवाह सत्कार सोहळा व ‘सकल लेवा संघटन-समृद्धीच्या दिशा’ या विषयावरील तज्ज्ञ पॅनल गटचर्चा जळगावच्या धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनी महाविद्यालयात नुकतीच झाली. समाजाच्या एकजुटीसाठी या चर्चेद्वारे मंथन करण्यात आले.
लेवा समाजातील विविध प्रवाह, संस्था व संघटनांना एका मंचावर आणून समाजाच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व राजकीय विकासाची दिशा निश्चित करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन होते. यावेळी माजी मंत्री आमदार एकनाथ खडसे, आमदार सुरेश भोळे, माजी आमदार शिरीष चौधरी, माजी खासदार तथा गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, निवृत्त सहायक पोलिस आयुक्त दत्तात्रय चौधरी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पुरुषोत्तम पिंपळे, महाराष्ट्र लेवा पाटीदार महासंघाचे अध्यक्ष अरुण बोरोले आदी विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी कवयित्री बहिणाबाई चौधरी व लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमांना माल्यार्पणासह दीपप्रज्वलन झाले. प्रास्ताविक डॉ. ज्ञानेश्वर पाटील यांनी केले. आंतरप्रवाह विवाह सत्कारार्थींच्या वतीने चंद्रशेखर पाटील व निशा पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर लेवा समाजातील आंतर प्रवाहातील विवाहितांचा सत्कार करण्यात आला.
चौकट
सर्व प्रवाहांनी एकत्र यावे : खडसे
समाजाने आपला इतिहास अभ्यासणे, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी एकसंघ होणे गरजेचे आहे, असे मत एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले. सुरेश भोळे यांनी समाजाच्या आर्थिक विकासासाठी शेतीला केंद्रस्थानी ठेवण्याचे आवाहन केले. डॉ. उल्हास पाटील यांनी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी ‘वन कम्युनिटी, वन व्हिजन’ हे सूत्र स्वीकारण्याचे आवाहन केले. सूत्रसंचालन सोनिता वराडे, मंगला पाटील, डॉ. मिलिंद पाटील व डॉ.ज्योती भोळे यांनी केले. गटचर्चेचे निवेदन डॉ. ज्ञानेश्वर पाटील यांनी केले.