महिलेला ठार मारणाऱ्यास
जन्मठेप, २० हजारांचा दंड
सकाळ वृत्तसेवा
नंदुरबार, ता. ३० : महिलेला ठार मारणाऱ्या आरोपीस न्यायालयाने जन्मठेप व २० हजार रुपयांचा दंड ठोठावला.
मुरसिंग तिरसिंग भिल (रा. शिरुडदिगर, ता. शहादा) याच्याकडे नातेवाईक श्रीराम काळू ऊर्फ काल्या शेवाळे- वाघे (रा. कुढावद, ता. शहादा), त्यांची पत्नी सिंधूबाई व दोन लहान मुलांसह पाहुणा म्हणून आला होता. श्रीरामने पत्नी सिंधुबाईस बाहेरगावी मजुरीसाठी जायचे असल्याचे सांगितले. सिंधुबाईने बाहेरगावी कामाला जाण्यास नकार दिल्याने दोघा पती-पत्नीत वाद झाला. दुसऱ्या दिवशी श्रीराम त्याची पत्नी सिंधुला पहाटे मारहाण व शिवीगाळ करीत होता. फिर्यादी मुरसिंगची पत्नी कोकीलाबाई ही सिंधुला मारहाण करू नको, असे समजविण्यास गेली. याचा राग आल्याने श्रीरामने कोकीलाबाईस शिवीगाळ करून घरातील लाकडी थापीने मारहाण केली. जखमी कोकीलाबाईस रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी तपासून मृत घोषीत केले. या प्रकरणी शहादा पोलिसात श्रीराम शेवाळे याच्यावर गुन्हा दाखल झाला. शहाद्याचे प्रभारी पोलिस अधिकारी एम. रमेश यांनी तपास करून आरोपीविरोधात शहादा अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्याची सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश-१ अ. वि. गुजराथी यांच्यासमोर झाली. सबळ पुराव्यांच्या आधारे श्रीराम शेवाळे याच्याविरुध्द गुन्हा सिध्द झाल्याने त्यास न्यायाधीश अ. वि. गुजराथी यांनी दोषी ठरवत जन्मठेप व २० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता ॲड. यशवंतराव बी. मोरे यांनी काम पाहिले. मुख्य पैरवी अधिकारी म्हणून पोलिस उपनिरीक्षक योगिता राठोड व विनोद पाटील, अंमलदार गणेश सावळे, पोलिस कर्मचारी देवीदास सूर्यवंशी, हवालदार प्रवीण पटेल, शैलेंद्र जाधव यांनी काम पाहिले.