तुलना करणे सोडल्यास जीवन सुंदर
प्रा. हेमंत टिळे ः शताब्दी स्कूलमध्ये जयकर व्याख्यानमाला
सकाळ वृत्तसेवा
सिन्नर, ता. २७ ः मनुष्य जन्म मिळणे दुर्लभ असून, मिळालेल्या मनुष्य देहाचा योग्य उपयोग केला तर जीवन अधिक सुखकर होईल. दुसऱ्याच्या सुखात सुख मानले, तर दुःखी होण्याचे कारणच राहणार नाही. त्यामुळे एकमेकांशी तुलना करणे बंद केले, तर आपले जीवन अधिक सुंदर बनेल, असे प्रतिपादन बहि:शालचे वक्ते प्रा. हेमंत टिळे यांनी केले.
आगासखिंड येथील शताब्दी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ बहि:शाल शिक्षण मंडळच्या डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेत ‘जीवन सुंदर आहे’ या विषयावर ते बोलत होते. संस्थेचे विश्वस्त प्रशांत वीर अध्यक्षस्थानी होते. विश्वस्त पूनम वीर, प्राचार्य जितेंद्र भारती, केंद्र कार्यवाह प्रा. आनंदा महाजन उपस्थित होते.
प्रा. टिळे यांनी भूतलावर सर्व सुखी असा माणूस कितीही शोधला तरी तो शोधूनही सापडणार नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात काहीना काही संकटे, समस्या असतातच. परंतु अशा संकटांचा सामना धीराने केला तर जीवनातील अडचणी आपण स्वतःच दूर करून जीवन अधिक सुंदर बनवू शकतो. आपल्यामुळे एखाद्याच्या चेहऱ्यावर निर्माण झालेला आनंद आपल्या जीवनाला अधिक सुखी बनवतो. मात्र आपल्यामुळे दुसऱ्याला झालेल्या दुःखामुळे आपण कधीही सुखी होऊ शकत नाही. हा साधा नियम आपण अंगीकारल्यास आपण आनंदी होऊ, असेही त्यांनी सांगितले.
प्रा. मालती निंबाळकर यांनी सूत्रसंचालन केले. केंद्र कार्यवाह प्रा. आनंदा महाजन यांनी आभार मानले.