लोगो : सकाळ विशेष
टॅगिंगअभावी दुष्काळात पशुधन मदतीपासून वंचित राहण्याची भीती!
पशुपालकांसमोर संकट; चारा अनुदान, छावण्या आणि विम्याच्या लाभासाठी टॅगिंगचे आवाहन
सकाळ वृत्तसेवा
इगतपुरी, ता. १७ : दुष्काळाची तीव्रता वाढत असताना पशुधनाच्या चारा आणि पाण्याचा प्रश्न गंभीर बनत आहे. अशा परिस्थितीत शासकीय चारा अनुदान, चारा छावण्या, पशुधन विमा आणि नैसर्गिक आपत्तीतील मदतीसाठी जनावरांच्या कानात टॅग असणे आवश्यक आहे. मात्र, तांत्रिक अडचणी, जनजागृतीचा अभाव आणि पशुपालकांच्या अनास्थेमुळे इगतपुरी तालुक्यात अद्याप अनेक जनावरांचे टॅगिंग झालेले नाही. त्यामुळे टॅगिंगअभावी पशुपालक शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित राहण्याची भीती व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागाने पशुपालकांना तातडीने टॅगिंग करून घेण्याचे आवाहन केले आहे.
दुष्काळात जनावरांचे संगोपन करणे शेतकऱ्यांसाठी मोठे आव्हान ठरणार आहे. चारा आणि पाण्याची टंचाई निर्माण झाल्यास जनावरांचा सांभाळ करण्यासाठी शासकीय मदत महत्त्वाची ठरणार आहे. मात्र, टॅगिंग नसल्यास विविध योजनांचा लाभ मिळण्यात अडचणी येऊ शकतात. आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना केवळ तांत्रिक कारणामुळे मदतीपासून वंचित ठेवल्यास पशुधन संकटात येण्याची शक्यता आहे. प्रसंगी शेतकरी जनावरे मोकाट सोडू शकतात. त्यामुळे भविष्यात मोकाट गुरांचा प्रश्नही गंभीर होण्याचा धोका आहे.
इगतपुरी तालुका पशुधन विकास अधिकारी डॉ. संतोष पजई यांनी सांगितले की, तालुक्यात अनेक जनावरांचे टॅगिंग पूर्ण झाले असून काहींचे बाकी आहे. विभागाकडे पुरेशा प्रमाणात टॅग उपलब्ध आहेत. मागणीनुसार जनावरांना टॅग लावून दिले जातात. मात्र, पशुपालकांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. काहींनी लावलेले टॅग काढून टाकल्याचेही निदर्शनास आले आहे. शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी पशुपालकांनी पुढाकार घेऊन टॅगिंग करून घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
टॅगिंगमधील अडचणीही दुर्लक्षित नकोत! टॅगमुळे जनावरांच्या कानाला सूज किंवा संसर्ग होणे, जंगलात चराईदरम्यान टॅग अडकून कान फाटणे, टॅग तुटणे तसेच नोंदणीसाठी नेटवर्क व तांत्रिक अडचणी येत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे टॅगिंगबाबत जनजागृती करण्यासोबतच पशुपालकांच्या तक्रारींचे निराकरण होणेही गरजेचे आहे.
इगतपुरी तालुक्याचे पशुधन व चारा नियोजन
- एकूण पशुधन : ६६ हजार ७६९
- दररोजची वैरण गरज : २९२ टन
- शिल्लक वैरण : ३१ हजार ९५ टन
- वैरण पुरवठ्याचा कालावधी : १२० दिवस
- चारा बियाणे योजनेचे लाभार्थी : ८४२ शेतकरी
- वाटप केलेले चारा बियाणे : ५ हजार ७१५
- चारा बियाण्याची मागणी : १६ हजार २००
- चारा विकासासाठी उपलब्ध अनुदान : निरंक