लॉकडाउनचा मेंढपाळांनाही फटका! गावबंदीमुळे शेतमालकांकडून व्यावसायिकांची कोंडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

shepherd business

लॉकडाउनचा मेंढपाळांनाही फटका! गावबंदीमुळे शेतमालकांकडून व्यावसायिकांची कोंडी

वडेल (जि. नाशिक) : कोरोना संसर्ग (Coronavirus) काळातील निर्बंध कठोर होत असताना मेंढपाळ बांधवांपुढे मेंढ्यांच्या पोषणाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. मेंढ्यांचे वाडे गावशिवारातच फिरत असल्यामुळे सध्या चाऱ्याची टंचाई जाणवत आहे. कोरोनाच्या कालावधीत अनेक ठिकाणी गावबंदी असल्यामुळे भटकंती करणाऱ्या मेंढपाळ समाजाची (shepherd Community) कोंडी झाली आहे. अनेक ठिकाणी गावातील घरे सोडून ग्रामस्थ शेतात स्थलांतरित झाल्याने बाहेरगावच्या मेंढपाळांना मळ्यामध्ये मेंढ्या बसविण्यास शेतमालकांकडून नकार मिळत आहे. (Lockdown is also hitting the shepherd business)

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे भटकंतीवर राहणाऱ्‍या मेंढपाळ समाजानेही बाहेरगावी वाडे नेण्याऐवजी गावशिवारातच चराई करण्यासाठी पसंती दिली आहे. मात्र, ज्या गावांत पाण्याचे दुर्भिक्ष्य आहे, तेथे मेंढ्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍न मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. दसऱ्यानंतर आपापले वाडे घेऊन भटकंतीवर निघणारे मेंढपाळ यंदा मात्र गावशिवारातच बंदिस्त झाले आहेत. मेंढ्यांचे पालनपोषण आजवर गाव परिसरात असलेल्या चाऱ्‍यावर होत होते. मात्र, आता गावशिवारातील चाराही संपुष्टात आल्याने तसेच कोरोनामुळे गावाबाहेर निघता येत नसल्याने मेंढीपालनाचा व्यवसाय चिंतेचा विषय ठरत आहे.

मालेगाव तालुक्यातील अजंग, कजवाडे, निमशेवडी, रामपुरा, कंक्राळे आदी गावांतील मेंढपाळ दर वर्षी परजिल्ह्यांमध्येही आपापले वाडे (तळ) घेऊन भटकंती करत असतात. मात्र, यंदा बाहेरगावी हे वाडे स्थलांतरित होऊ न शकल्याने मेंढपाळ बांधवांसमोर निदान पावसाळा येईपर्यंत तरी मेंढ्यांचे पालनपोषण करण्याचा मोठा प्रश्‍न आहे.

गावोगावी कोरोनाच्या भयानक साथीमुळे वेगवेगळ्या गावी भटकंती करून मेंढ्या जगविणारा मेंढपाळ समाज सध्या स्वत:च्या गावशिवारातच बंदिस्त झाला आहे. त्यामुळे मेंढ्यांचे पोषण कसे होईल, ही चिंता त्यांना भेडसावत आहे.

- वसंत हळनर, मेंढपाळ, रामपुरा, ता. मालेगाव

दर वर्षी गावोगावी भटकंती करून मेंढ्यांचे पालनपोषण करणाऱ्या समाजापुढे यंदा कोरोना महामारीमुळे भटकंतीचा प्रश्‍न उभा राहिला आहे. गावोगावी गावबंदी झाल्याने तसेच असलेल्या कोरोना रुग्णांमुळे मेंढपाळ बांधवांचे वाडे (तळ) सध्या स्वत:च्या गावशिवारापुरतेच मर्यादित झाले आहेत.

- उमेश हळनर, मेंढपाळ, रामपुरा, ता. मालेगाव

(Lockdown is also hitting the shepherd business)

टॅग्स :CoronavirusNashik