३१५२६, २७, २८, २९, ३०
लोकहितवादी, गुरूवर्य पुरस्कार जाहीर
बुरकुले, बीडकर, देशमुख तसेच वैरागकर, नाडगौडा यांचा समावेश
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता.६ : पद्मभूषण वि.वा.शिरवाडकर तथा कविश्रेष्ठ कुसुमाग्रज संस्थापित लोकहितवादी मंडळ, नाशिक या सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत संस्थेच्या वतीने दर दोन वर्षांनी देण्यात येणारे ‘लोकहितवादी’ व गुरुवर्य हे पुरस्कार मंगळवारी जाहीर करण्यात आले.
यंदाचा लोकहितवादी पुरस्कार सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल कुसुम बुरकुले, शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल हेमलता बीडकर तसेच संस्कृत भाषा संवर्धन आणि ज्येष्ठ नागरिक सेवा कार्याबद्दल सरिता देशमुख (मरणोत्तर) व रमेश देशमुख यांना संयुक्तपणे जाहीर करण्यात आला आहे. तर गुरूवर्य पुरस्कार शास्त्रीय संगीत गुरू पंडित शंकरराव वैरागकर आणि कथक नृत्य गुरू रेखा नाडगौडा यांना जाहीर करण्यात आला.
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष, अभिनेते योगेश सोमण यांच्या हस्ते शनिवार, १० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता परशुराम साईखेडकर नाट्यगृह येथे आयोजित कार्यक्रमात हे दोन्ही पुरस्कर देण्यात येणार आहेत. लोकहितवादी संस्था यंदा अमृत महोत्सवी वर्ष साजरे करत आहे. या पुरस्कार समारंभासाठी कलाकार, रसिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन संस्था पदाधिकारी यांच्यावतीने करण्यात आले आहे.