फोटो : A15034
नाशिक : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या उपस्थितीत बालकास त्याच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले
--
मायेची ऊब अन् प्रयत्नांची पराकाष्ठा
हरवलेला पाच वर्षांचा चिमुकला कुटुंबीयांच्या स्वाधीन
सकाळ वृत्तसेवा
जुने नाशिक, ता. १८ : अनोळखी शहर, अनोळखी माणसे आणि मनात दाटलेली भीती, पाच वर्षांच्या निरागस बालकाच्या वाट्याला आलेल्या या अनिश्चिततेच्या काळात त्याला मायेची ऊब देणारा एक प्रेमळ हात पुढे आला. महिनाभर त्याचा आईप्रमाणे सांभाळ केला, त्याच्या अबोल चेहऱ्यामागील वेदना समजून घेतल्या आणि प्रयत्नांनी मध्य प्रदेशातील त्याच्या घराचा शोध लावला. नवरात्रोत्सवाच्या मंगलमय काळात या बालकाला त्याच्या भावाच्या स्वाधीन करण्यात आले. या भावस्पर्शी पुनर्मीलनाने आधाराश्रमातील वातावरण आनंदाश्रूंनी भरून गेले. सामाजिक कार्यकर्ती प्रणाली पिंगळे- पाटील या बालकासाठी धावून आल्या.
१० सप्टेंबरला नाशिक रोड रेल्वे पोलिसांमार्फत पाच वर्षांच्या एका बालकाला आधाराश्रमात दाखल केले होते. आधाराश्रमात दाखल झाल्यापासून प्रणाली पिंगळे- पाटील यांनी बालकाची काळजी घेतली. प्रेमाने संवाद साधत, त्याच्याशी गप्पा मारत आणि त्याला विश्वासात घेतले. चार दिवसांच्या प्रयत्नांनंतर बालक हळूहळू प्रतिसाद देऊ लागले. गप्पांच्या ओघात एक दिवस त्याने मध्य प्रदेशातील एका गावाचे नाव घेतले. प्रणाली यांनी हीच धाग्याची खूण मानली. यानंतर त्यांनी इगतपुरी रेल्वेस्थानकावरील सीसीटीव्ही फुटेज मिळवले. रेल्वे पोलिसांनी मध्य प्रदेशातील संबंधित रेल्वेस्थानकाशी संपर्क साधला. अवघ्या दोन तासांच्या आत त्या भागात एक मुलगा हरवल्याची पोलिसांकडे नोंद असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे बालकाच्या कुटुंबापर्यंत पोचण्याचा मार्ग मोकळा झाला. या संपूर्ण प्रक्रियेत इगतपुरी रेल्वे पोलिस अधिकारी कैलास बोडके यांचे सहकार्य लाभले. अमेय (नाव बदलले आहे) याच्या आई-वडिलांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असल्याने त्यांना स्वतः नाशिकला येणे शक्य झाले नाही. त्यामुळे त्यांनी मोठ्या मुलाला संबंधित पोलिसांसोबत नाशिकला पाठवले. आवश्यक कायदेशीर कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर नवरात्रोत्सवात मध्य प्रदेश पोलिसांच्या उपस्थितीत अमेयला त्याच्या मोठ्या भावाच्या स्वाधीन करण्यात आले. या वेळी जिल्हाधिकारी डॉ. आयुष प्रसाद, बालकल्याण समितीचे अध्यक्ष मिलिंद बाबर आणि जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुनील दुसाने आधाराश्रमाचे कार्यवाह हेमंत पाठक, कल्याणी दातार आदी उपस्थित होते.