32042
नंदुरबार : हरवलेली दागिन्यांची पर्स महिलेला सुपूर्द करताना संदीप पाटील, भुणेश मराठे, अमोल देशमुख, राजेंद्र काटके, योगेंद्र दोरकर आदी.
---------------------------
हरवलेली दागिन्यांची पर्स
काही तासांतच महिलेच्या स्वाधीन
सकाळ वृत्तसेवा
नंदुरबार, ता. १३ : शहरातील मिराज सिनेमागृहात चित्रपट पाहण्यासाठी गेलेल्या महिलेची सोन्याचे दागिने असलेली पर्स नंदुरबार शहर पोलिसांनी काही तासात शोधून काढत संबंधित महिलेस परत केले. पर्स आणि त्यातील सोन्याचे दागिने सुखरूप परत मिळताच संबंधित महिलेस अश्रू अनावर झाले.
रंजना मराठे या मिराज सिनेमागृहात चित्रपट पाहण्यासाठी गेल्या होत्या. चित्रपट संपल्यानंतर त्या घरी निघून गेल्या; मात्र, यादरम्यान त्यांची पर्स नेमकी कोठे राहिली, हे त्यांच्या लक्षात आले नाही. पर्समध्ये सोन्याचे दागिने असल्याने त्या चिंताग्रस्त झाल्या. याबाबत माहिती मिळताच नंदुरबार शहर पोलिसांसह गुन्हे शोध पथकाने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन शोधकार्य सुरू केले. पोलिसांच्या तत्परतेमुळे काही तासांतच हरविलेली पर्स शोधून काढण्यात यश आले. पर्समधील सोन्याचे दागिने सुरक्षित असल्याची खात्री करून सदर पर्स संबंधित महिलेस परत करण्यात आली.
पोलिसांनी दाखविलेली तत्परता आणि सिनेमागृहाच्या कर्मचाऱ्यांनी दिलेले सहकार्य यामुळे दागिने परत मिळाले, अशी प्रतिक्रिया श्रीमती. मराठे यांनी दिली. शहर पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील उपनिरीक्षक भुणेश मराठे, अमोल देशमुख, राजेंद्र काटके, रूपेश पगारे आणि निंबा वाघमोडे यांनी ही कामगिरी केली.