esakal | भगवती दर्शनासाठी महिलांची लोटली गर्दी
sakal

बोलून बातमी शोधा

भगवती दर्शनासाठी महिलांची लोटली गर्दी

भगवती दर्शनासाठी महिलांची लोटली गर्दी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पंचवटी : ललिता पंचमी, तसेच रविवारच्या सुटीचे औचित्य साधत कालिकामातेसह ग्रामदैवत भद्रकाली, पंचवटीतील सांडव्यावरील देवीदर्शनासाठी महिलांची मोठी गर्दी उसळली होती. दरम्यान, राज्यभरातील रक्ताच्या तुटवड्याच्या पार्श्‍वभूमीवर कालिकामाता देवस्थानतर्फे सामाजिक जाणिवेतून आजपासून पुढील पाच दिवस रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

यंदा चतुर्थी व पंचमी एकत्र आल्याने, तसेच रविवारच्या सुटीचे औचित्य साधत कालिकादेवीसह भद्रकाली, सांडव्यावरील देवीदर्शनासाठी मोठी गर्दी उसळली होती. यंदा देवस्थानतर्फे स्वतंत्र रांगांची व्यवस्था करण्यात आल्याने सर्वांचेच दर्शन सुलभ झाल्याची भावना भाविकांनी व्यक्त केली. राज्यभरातील रक्ताच्या तुटवड्यामुळे सामाजिक भान राखत श्री कालिका देवस्थानतर्फे आजपासून पुढील पाच दिवस रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे मुख्य विश्‍वस्त केशवअण्णा पाटील यांनी सांगितले. मागील वर्षीप्रमाणेच यंदाही कालिकादेवी यात्रोत्सवात रहाट पाळण्यांसह अन्य खेळणी, खाऊचे स्टॉल्स नसल्याने बच्चेकंपनीचा हिरमोड झाला.

हेही वाचा: ‘लखीमपूर’च्या निषेधार्थ आज महाराष्ट्र ‘बंद’

नाशिकचे ग्रामदैवत असलेल्या श्री भद्रकाली देवीमंदिरात अष्टांग भुजादेवीला रोज वेगवेगळ्या प्रकारचे साज चढविण्यात येत आहेत. ललिता पंचमीचे औचित्य साधत देवीचे स्कंदमाता रूपाने महिला भाविकांना मोहिनी घातली. सोमवारी (ता. ११) देवी कात्यायनीच्या रूपात भाविकांना दर्शन देईल. छत्रपती शिवाजी महाराजांचे तत्कालीन सरदार विमाजी पटवर्धन यांनी या मंदिराला जागा दिली. आक्रमकांना मंदिर कळू नये म्हणून या मंदिराला वाड्याचे रूप देण्यात आल्याचे सांगण्यात आले. देवीला रोज पंचामृत स्नानाने महाभिषेक सुरू असून, विश्‍वस्तांसह पुजाऱ्यांनी विश्‍वकल्याणाचा संकल्प करून यंदा घटस्थापना करण्यात आल्याचे सांगितले.

यंदा जागर नाहीच

सांडव्यावरील देवीमंदिरात दरवर्षी ललिता पंचमीचे औचित्य साधत जागर-गोंधळाचे आयोजन करण्यात येते. हा विधी पाहण्यासाठी मंदिराच्या आवारात मोठी गर्दी उसळते. यंदा कोरोना सावटामुळे गोंधळ विधी रद्द करण्यात आल्याचे देवस्थानतर्फे सांगण्यात आले. दरम्यान, कालिका मंदिरात हार, नारळ, ओटीचे सामान नेण्यास मज्जाव करण्यात आल्याने सांडव्यावरील देवीमंदिरात देवीची ओटी भरण्यासाठी महिलांची मोठी गर्दी उसळत आहे.

loading image
go to top