३६-४
‘अंनिस’च्या मदतीने अखेर प्रेमाचा विजय
---------------
विमला एम. यांच्या मध्यस्थीने मुलीचा जबाब ः दिंडोरी पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
-----------
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ५ : दिंडोरी येथील एका सज्ञान जोडप्याने वैदिक पद्धतीने प्रेमविवाह केला; पण मुलीच्या घरच्यांचा तो मान्य नव्हता. दिंडोरी पोलिसांनी मुलीच्या नातेवाइकांची बाजू घेत मुलाला दमदाटी करून मारहाण केली. नातेवाइकांनी पळवून नेलेल्या मुलीची महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मदतीने सुटका होऊन तिला बुधवारी (ता. ४) रात्री उशिरा पोलिसांसमक्ष मुलाच्या ताब्यात देण्यात आले.
------------
संतोष व संगीता (दोघांचे नाव बदलले आहे) हे दिंडोरी येथील रहिवासी आहेत. संतोष संगणक अभियंता आहे; तर संगीताने औषधनिर्माणशास्त्राची पदवी घेतली. त्यांचे चार वर्षांपासून प्रेम होते. दोघेही एकाच जातीतील आहेत. मात्र, संगीताच्या घरच्यांनी त्यांच्या विवाहास विरोध दर्शविल्याने दोघांनी ३१ ऑक्टोबरला वैदिक पद्धतीने रीतसर विवाह केला. संगीताच्या नातेवाइकांनी तिच्या अपहरणाची तक्रार दिंडोरी पोलिसांत दाखल केली. पीडित हे जागरूक नागरिक म्हणून स्वतःहून पोलिसांत हजर झाले व विवाह रीतसर केल्याची कागदपत्रे त्यांनी दाखविली. पोलिसांनी दोघांच्या घरच्यांचा बोलवून घेतले. संगीताच्या घरच्यांनी जमाव जमा करीत स्थानिक राजकारणी व्यक्तीच्या मदतीने पोलिसांवर दबाव आणला. एका पोलिस अधिकाऱ्याने संतोषला, तर महिला पोलिस अधिकाऱ्याने संगीताला मारहाण केली. संगीताचा जबाब घेण्यास पोलिसांनी टाळाटाळ केली. पीडित जोडपे घरी परतत असताना जमावाने मारहाण करीत संगीताला जबरदस्तीने पळवून नेले. पहाटे संगीताला तिच्या नातेवाइकांनी शहा-पंचाळे येथील एका भोंदूबाबाकडे नेले. संगीता ही संतोषबरोबर राहिल्यास त्याचा दोन महिन्यांत मृत्यू होईल, असे भोंदूबाबाने तिला सांगितले व तिला पाण्यातून उदी पिण्यास दिली. एक धागा व मंतरलेले लिंबू नदीत सोडण्यास सांगितले. तिचे कपडे फाडून अघोरी विधी केला गेला. संगीताने मात्र संतोषकडे जाण्याचा हट्ट धरला.
दुसऱ्या दिवशी संतोषने महाराष्ट्र ‘अंनिस’च्या जातपंचायत मूठमाती अभियानाचे राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांच्याशी संपर्क केला. ‘अंनिस’ कार्यकर्त्यांनी संतोष व त्याच्या नातेवाइकांना सोबत घेऊन अतिरिक्त पोलिस आयुक्त विमला एम. यांच्याशी चर्चा केली. त्यांनी दिंडोरी पोलिसांची चांगलीच खरडपट्टी केली. मुलीला तत्काळ पोलिस ठाण्यात हजर करून जबाब घेण्याचा आदेश दिला. त्याप्रमाणे बुधवारी (ता. ४) रात्री उशिरा संगीताने नाशिक तालुका पोलिस ठाण्यात संतोषबरोबर राहण्याचा जबाब दिला. पोलिसांनी तिला कार्यकर्त्यांसमोर संतोषकडे सुपूर्द केले. जोडप्याने ‘अंनिस’चे आभार मानले. ‘अंनिस’चे राज्य प्रधान सचिन डॉ. टी. आर. गोराणे, राज्य कार्यवाह चांदगुडे, राज्य सदस्य प्रल्हाद मिस्री, रंजन लोंढे व ॲड. विद्या चांदगुडे यांनी या मोहिमेत भाग घेतला.
-----------------