धुळे : टुडे पान २ साठी.. अँकर
--
फोटो क्रमांक : 33181
धुळे : महाराष्ट्र अंनिसतर्फे झालेल्या चमत्कार सादरीकरण प्रशिक्षण शिबिरात विविध चमत्कारांचे प्रात्यक्षिक दाखवताना तज्ज्ञ मार्गदर्शक. शेजारी उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्ते.
--
‘अंनिस’तर्फे धुळ्यात चमत्कार सादरीकरण प्रशिक्षण
--
अंधश्रद्धेचे समूळ उच्चाटन करण्यासाठी कार्यकर्त्यांचा पुढाकार
--
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. २१ : समाजात दैवी शक्तीचा दावा करून भोंदू बाबांकडून होणारी फसवणूक रोखण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती धुळे शाखेतर्फे कार्यकर्त्यांसाठी चमत्कार प्रयोग सादरीकरण प्रशिक्षण शिबिर नुकतेच पार पडले. पांझरा नदीकिनाऱ्यावरील मराठा सेवा संघाच्या सभागृहात हे शिबीर झाले.
-
जगात कोणताही चमत्कार नसून प्रत्येक चमत्कारामागे वैज्ञानिक तत्त्व, रासायनिक अभिक्रिया, हातचलाखी किंवा सरावाने आत्मसात केलेले शारीरिक कौशल्य असते. कार्यकर्त्यांनी हे प्रयोग शिकल्यास रंजक पद्धतीने शास्त्रीय दृष्टिकोन रुजवणे सोपे जाते. विशेषतः अशिक्षित व अल्पशिक्षित घटकांची होणारी आर्थिक, मानसिक व लैंगिक फसवणूक थांबवण्यासाठी हे प्रशिक्षण उपयुक्त ठरणार आहे. सहभागी कार्यकर्त्यांना २० विविध चमत्कारांचे प्रयोग, त्यामागील विज्ञान, हातचलाखी, प्रयोग सफाईदारपणे सादर करण्याचे तंत्र, घ्यावयाची दक्षता, मांडणी व प्रबोधनात्मक मुद्दे याचे सखोल प्रशिक्षण देण्यात आले.
-
शिबिरासाठी तज्ज्ञ प्रशिक्षक म्हणून अंनिस राज्य प्रशिक्षण विभागाचे कार्यवाह कीर्तिवर्धन तायडे व नंदुरबार जिल्हा कार्याध्यक्ष वसंत वळवी उपस्थित होते. संघटनेचे राज्य कार्यवाह प्रा. परेश शाह यांनी संघटित कामाचे महत्त्व व बुवाबाजीच्या बदलत्या स्वरूपावर मार्गदर्शन केले. या प्रसंगी दस्तऐवज संकलन विभागाचे राज्य सहकार्यवाह डॉ. सुरेश बिराडे, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. शरद वाणी, जिल्हा प्रधान सचिव नवल ठाकरे, वैज्ञानिक जाणीवा प्रकल्प विभागाचे जिल्हा कार्यवाह प्रा. रणजित शिंदे, विविध उपक्रम विभागाचे दिलीप खिवसरा, धुळे शाखेचे प्रधान सचिव शंकर सगरे, शाखा कार्याध्यक्ष स्वप्निल खैरनार, प्रधान सचिव नितीन बागूल, क्रियाशील सदस्य शरद मोरे, हृदयनाश मोरे, रितेश ठाकरे उपस्थित होते. शाहूराजे शिंदे यांनी आभार मानले.