esakal | VIDEO: 'यात तर साधे विज्ञान'; लोखंड चिकटण्याच्या दाव्याची 'अंनिस'कडून पोलखोल
sakal

बोलून बातमी शोधा

VIDEO: लोखंड चिकटण्याच्या दाव्याची 'अंनिस'कडून पोलखोल

VIDEO: लोखंड चिकटण्याच्या दाव्याची 'अंनिस'कडून पोलखोल

sakal_logo
By
विनायक होगाडे

नाशिक : नाशिकच्या सिडको भागात राहणारे अरविंद सोनार यांच्या शरीरावर कुठल्याही धातूच्या वस्तू थेट चिटकत असल्याचा व्हिडीओ तुम्ही पाहिला असेल. तो पाहून तुम्हाला देखील आश्चर्य वाटलं असेल. विशेष करून सोनार यांनी कोरोनाची लस घेतल्यानंतर हा प्रकार त्यांच्याबाबतीत घडत असल्याचे त्यांनी स्वत: सांगितलंय. त्यामुळे हे प्रकरण आणि त्यांचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आहे. हे प्रकरण इतक्यावरच थांबलं नाहीये तर, या एकूण प्रकाराबाबत आता आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी चौकशीचे करण्याचे आदेश देखील दिले आहेत. लोकांना यामध्ये मोठं कुतूहल वाटत असून लस घेतल्यानंतर खरंच असं काही होतं का? असा मोठा दिव्यप्रश्नच या व्हिडीओच्या माध्यमातून उभा राहिला आहे. मात्र, आता या 'लस घेतल्यानंतर लोखंडी वस्तू चिकटण्याच्या' कथित प्रकाराची पोलखोल महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून करण्यात आली आहे.

नेमका काय आहे दावा?

अरविंद सोनार यांच्या शरीरावर कुठल्याही धातूच्या वस्तू थेट चिटकत असल्याने सर्वत्र जोरदार चर्चा सुूरू झाली आहे. याचा व्हिडीओ देखील त्यांनी केलेला आहे. तो व्हिडीओ व्हायरल झाल्यावर 'सकाळ'ने याचा पाठपुरावा केला. यावेळी कोविशिल्ड लसीचे दोन डोस (Corona vaccination) घेतल्यावर अरविंद सोनार यांच्या शरीराला अचानक सर्व वस्तू चिकटायला लागल्या. असे सोनार यांनी सांगितलंय. यावेळी सोनार यांनी वस्तू स्वतःच्या अंगाला चिकटवून सुद्धा दाखवल्या आहेत. "मी लस घेतल्यानंतर हा प्रकार घडतो आहे. यापूर्वी माझ्या आयुष्यात अशा कोणत्याही वस्तू माझ्या अंगाला चिटकत नव्हत्या. हा नक्की काय प्रकार आहे? याबद्दल मी डॉक्टरांचा सल्ला घेणार आहे", असं अरविंद सोनार यांनी म्हटलं आहे.

काय आहे महाराष्ट्र अंनिसचा खुलासा?

अंनिसचे कार्यकर्ते अण्णा कडलासकर यांनी नाशिकमधील या 'चुंबकत्व दाव्या'चा फोलपणा सिद्ध केला आहे. त्यांनी केलेल्या खुलाशानुसार, खरे तर हा प्रयोग कोणीही माणूस करून पाहू शकतो. नाणे, उलथन जरासे ओले करून घ्या आणि पोट, दंड, पाठ अशा सपाट भागावर हलकेसे दाबून ठेवा. निर्वात पोकळी निर्माण होऊन जरावेळ अशी वस्तू चिकटून राहते. पाणी सुकले की मात्र पडते हमखास! आज ही बातमी साम मराठी वाहिनीवर येताच आम्ही पटकन स्वतः प्रयोग केला. आणि अशा अवैज्ञानिक दाव्याची पोलखोल केली. जगात असे चुंबकत्व कोणाच्याही अंगात येऊ शकत नाही! असा दावा अंनिसने केला आहे. सोबतच याचा व्हिडीओ देखील अंनिसकडून प्रसारित करण्यात आला आहे. अण्णा कडलास्कर यांनी देखील अरंविद सोनार यांच्याप्रमाणेच लोखंडी वस्तू स्वत:च्या शरिराला चिकटवून दाखवण्याचा हा कथित चमत्कार करुन दाखवला आहे.

याविषयी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते हमीद दाभोलकर म्हणाले की, कारोनाची लस आणि अंगाला नाणी आणि भांडी चिकटण्या मागे साधा पदार्थ विज्ञानाच्या नियम आहे. त्याचा करोना लसीकरणाशी संबंध जोडणे चुकीचे आहे. लसीकरण हे करोना विरोधी लढ्यातील महत्वाचे शस्त्र आहे. त्याविषयी सनसनाटी दावे करण्याआधी त्याची चिकित्सा होणे आवश्यक आहे.

या प्रकाराची चौकशी करण्याचे राजेश टोपेंचे आदेश

वैद्यकीय चाचण्या करून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आलेत. आता आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी चौकशीचे करण्याचे आदेश दिले आहेत. आरोग्य मंत्री टोपे म्हणाले, यामागे नक्की काय आहे, ते तपासले जाईल. मेडिकल कारण काय आहे, हे तपासू या. त्यानंतर नक्की कशामुळे हे झाले आहे, ते पाहू.

अंनिसनं जाहीर केलेला व्हिडिओ