OZM26B15020
म्हाळसाकोरे ः येथील उपकेंद्रात अतिरिक्त ट्रान्स्फॉर्मरच्या लोकार्पणप्रसंगी आमदार दिलीप बनकर, अधीक्षक अभियंता अनिल थोरात, कार्यकारी अभियंता अनिल शेतकरी, कार्यकारी अभियंता संदीप शिंदे यांच्यासह नागरिक.
----------------------
शेतकऱ्यांना सलग आठ तास वीजपुरवठा
------------
म्हाळसाकोरे उपकेंद्रात अतिरिक्त ५ एमव्हीए ट्रान्स्फॉर्मर, आठ गावांची वीजसमस्या सुटणार
सकाळ वृत्तसेवा
ओझर, ता.१६ ः म्हाळसाकोरे येथील ३३/११ केव्ही वीज उपकेंद्रात नव्याने उभारण्यात आलेल्या अतिरिक्त ५ एमव्हीए क्षमतेच्या ट्रान्स्फॉर्मरचे लोकार्पण आमदार दिलीप बनकर यांच्या हस्ते झाले. या ट्रान्स्फॉर्मरमुळे गोदाकाठ परिसरातील आठ गावांतील वीज समस्येला मोठा दिलासा मिळणार असून, शेतीपंपांसाठी सलग आठ तास सुरळीत वीजपुरवठ्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
---------------
गोदाकाठ परिसरातील शेतीसाठी विजेची वाढती मागणी लक्षात घेऊन आमदार बनकर यांनी महावितरणचे अधीक्षक अभियंता अनिल थोरात यांच्याशी चर्चा केली होती. त्यानंतर शासनदरबारी सातत्याने पाठपुरावा करून अतिरिक्त ट्रान्स्फॉर्मरचे काम पूर्णत्वास नेले. अतिरिक्त ५ एमव्हीए ट्रान्स्फॉर्मरची भर पडल्याने म्हाळसाकोरे, मांजरगाव, खानगाव थडी, तारुखेडले, तामसवाडी, करंजी, ब्राह्मणवाडे व भुसे या आठ गावांतील वीजपुरवठा व्यवस्थेला अधिक बळकटी मिळणार आहे.
-----------
आश्वासने पूर्ण करणार ः बनकर
आमदार बनकर म्हणाले,‘ या भागातील वीज समस्या सोडविण्यासाठी हा अतिरिक्त ट्रान्स्फॉर्मर महत्त्वाचा ठरणार आहे. निवडणुका संपल्यानंतर मी कोणताही गट किंवा पक्ष मानत नाही,तर सर्वसामान्य जनतेच्या विकासाला प्राधान्य देतो. नांदूरमध्यमेश्वर धरणाच्या दहा गेटचे काम पूर्णत्वास नेणे ही आपली जबाबदारी असल्याचेही त्यांनी सांगितले.
-------------
आजपासून आठ तास वीज
श्री. थोरात यांनी पाच एमव्हीए क्षमतेचा अतिरिक्त ट्रान्स्फॉर्मर कार्यान्वित झाल्याने मंगळवारपासून (ता.१७) शेतकऱ्यांना सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत सलग आठ तास अखंडित वीजपुरवठा देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या वीजविषयक कोणत्याही समस्या असल्यास त्या तातडीने सोडविण्यात येतील. महावितरणचे अधीक्षक अभियंता अनिल थोरात,कार्यकारी अभियंता अनिल शेतकरी,ओझर उपविभागाचे कार्यकारी अभियंता संदीप शिंदे तसेच शाखा अभियंता भेरुड उपस्थित होते.
दत्तूभाऊ मुरकुटे यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. जगन कुटे, सोपान खालकर, प्रवीण जगताप, वाळीबा जगताप,संतोष बाजारे,नंदू सांगळे आदींनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमानंतर आमदार बनकर यांनी नांदूरमध्यमेश्वर धरणाच्या दहा गेटच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. पाणी आवर्तनाच्या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना विविध सूचना देत सुरू असलेल्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले.
-------------------
२०-२ चौकट
सिमेंट अस्तरीकरण होऊ देणार नाही
नांदूरमध्यमेश्वर धरणाच्या उजव्या कालव्याला पाटबंधारे विभागाकडून सिमेंट अस्तरीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या भावना आणि विरोध लक्षात घेता हे काम कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही, अशी ठाम ग्वाही आमदार दिलीप बनकर यांनी शेतकऱ्यांना दिली. त्यांच्या भूमिकेमुळे खानगाव थडी, तारुखेडले, तामसवाडी व करंजी परिसरातील शेतकऱ्यांनी धन्यवाद दिले.
------------