३०-२
आयुक्त जाधव यांच्यासह
तिघांचा जामीन अर्ज मंजूर
-------------
सकाळ वृत्तसेवा
मालेगाव, ता.४ ः लाचेची मागणी केल्याप्रकरणी येथील महापालिकेचे आयुक्त रवींद्र जाधव, स्वीय साहाय्यक नीलेश पाटील व लेखाधिकारी हरीश डिंबर यांना येथील न्यायालयाने बुधवारी (ता. ४) जामीन मंजूर केला. प्रत्येकाला ५० हजाराची सुरक्षा अनामत भरणे व ५० हजाराच्या जातमुचलक्यावर तसेच आठवड्यातून तीन दिवस लाचलुचपत विभागाच्या कार्यालयात हजेरी लावण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
तक्रारदार ठेकेदाराकडून दोन कामांचे २० लाखाचे बिल मंजूर करून देण्यासाठी ४ टक्केप्रमाणे ८० हजार रूपये लाचेची मागणी केल्याप्रकरणी नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने २९ ऑक्टोबरला तिघांना अटक केली होती. आयुक्त जाधव, स्वीय साहाय्यक नीलेश पाटील व लेखाधिकारी हरिष डिंबर या तिघांविरुद्ध किल्ला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी केलेल्या घर झडतीत लेखाधिकारी डिंबर यांच्याकडे काही रक्कम सापडली होती. मात्र आयुक्त जाधव व स्वीय साहाय्यक नीलेश पाटील यांच्याकडे कोणतीही रोकड सापडली नव्हती.
तिघा संशयित आरोपींतर्फे ॲड वासिफ यांनी न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. फिर्यादीतील नोंदीचा आधार घेत तिघांनी कथित लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट होत नसल्याचे ॲड वासिफ यांनी युक्तिवादात सांगितले. गुन्ह्याचा तपास देखील जवळपास पूर्ण झाला आहे. त्यामुळे तिघांचा जामीन अर्ज मंजूर करण्याची विनंती न्यायालयाला केली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने आयुक्तांसह तिघांचा जामीन अर्ज मंजूर केला.