राज्यातील १४७ कारखान्यांच्या चिमण्या पेटल्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sugar factories
राज्यातील १४७ कारखान्यांच्या चिमण्या पेटल्या

राज्यातील १४७ कारखान्यांच्या चिमण्या पेटल्या

sakal_logo
By
गोकुळ खैरनार -सकाळ वृत्तसेवा

मालेगाव : राज्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू झाला. पहिल्याच दिवशी हंगाम सुरू करण्याचा मान वारणानगर (ता. पन्हाळा) येथील श्री तात्यासाहेब कोरे सहकारी कारखाना, अंकुशनगर (ता. अंबड) येथील कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी व पडसाळी (ता. म्हाडा) येथील श्री संत कुर्मदास सहकारी या तीन कारखान्यांना मिळाला. २० नोव्हेंबरअखेर राज्यात २४६ पैकी १४७ कारखाने सुरू झाले. गेल्या वर्षी सहकारी व खासगी अशा एकूण १९० कारखान्यांनी साखर उत्पादन घेतले. या वर्षी मुबलक ऊस असल्याने नोव्हेंबरअखेर हंगाम सुरू करणाऱ्या कारखान्यांची संख्या दोनशेपर्यंत पोचू शकते.

हेही वाचा: Repeal Three Farm Laws : अखेर नरेंद्र मोदी नमले

सलग तीन वर्षांपासून राज्यात सर्वदूर मुबलक पाऊस होत आहे. जलसाठे तुडुंब भरल्याने उसाच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. या वर्षी हंगाम सुरू झाल्यानंतर साधारणतः महिन्याभरात १४७ कारखाने सुरू झाले. दिवाळीमुळे अनेक ठिकाणी ऊसतोडणी कामगार उशिरा पोचले. त्यामुळे काही कारखाने सुरू होण्यास उशीर झाला. आणखी आठवडाभरात २० ते २५ कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू होईल. सोलापूर विभागात सर्वाधिक ३५ कारखाने सुरू झाले. त्या खालोखाल कोल्हापूर ३० व पुणे विभागात २६ कारखाने सुरू झाले. अहमदनगर विभागात २० कारखान्यांच्या चिमण्या पेटल्या आहेत.

या वर्षीच्या गळीत हंगामात महिनाभरात राज्यात १३८ लाख टन उसाचे गाळप झाले आहे. आतापर्यंतचा साखर उतारा ८.८३ एवढा वाढला आहे. सांगली जिल्ह्यातील काही साखर कारखान्यांचा उतारा ११ पेक्षा अधिक आहे. उत्तर महाराष्ट्रात नाशिक- नऊ, धुळे- दोन, नंदुरबार- तीन व जळगाव जिल्ह्यात सात असे एकूण २१ कारखाने आहेत. आतापर्यंत सात कारखाने सुरू झाले आहेत. कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले व अवसायनात निघालेले कारखाने पुन्हा सुरू होण्याची शक्यता धूसर आहे. हंगाम सुरू झाल्यामुळे राज्यभरातील ऊसतोडणी कामगार, मुकादम, कारखान्यातील कामगार, ट्रकचालक-मालक आदींसह विविध घटकांना दिलासा मिळाला आहे. कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्याने या वर्षी हंगाम मार्च-एप्रिलपर्यंत सुरू राहण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: अग्रलेख : चित्ती असू द्यावे वित्तभान!

"उसाचे क्षेत्र वाढल्याने या वर्षी राज्यात दोनशेपेक्षा अधिक कारखाने सुरू होऊ शकतील. पश्‍चिम महाराष्ट्राच्या तुलनेने उत्तर महाराष्ट्रात उसाला भाव कमी मिळतो. राज्यात उसाला सर्वत्र सारखेच दर मिळायला पाहिजेत. ऊस उत्पादकांना किमान आधारभूत किंमत (एफआरपी) एकाच टप्प्यात मिळायला हवी."

-कुबेर जाधव, राज्य समन्वयक, स्वाभिमानी शेतकरी संघटना

loading image
go to top