ॲंकर
(महावितरणचे चित्र वापरता येईल)
--
‘महावितरण’च्या अभय योजनेला ग्राहकांचा प्रतिसाद
जळगाव परिमंडलातील १२ थकबाकीदारांनी घेतला लाभ; व्याज आणि दंड माफ
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १४ : वीजबिलांच्या थकबाकीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी महावितरणने सुरू केलेल्या ‘अभय योजना २०२६-२७’ ला सुरुवातीपासूनच प्रतिसाद मिळू लागला आहे. योजना सुरू झाल्यानंतर पहिल्या दोन दिवसांत जळगाव परिमंडलातील १२ ग्राहकांनी थकीत मूळ रक्कम भरून व्याज व विलंब आकाराच्या माफीचा लाभ घेतला आहे. यात जळगाव मंडलातील १०, तर धुळे मंडलातील दोन ग्राहकांचा समावेश आहे.
कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या बिगरकृषी घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहकांसाठी ही योजना लागू आहे. याअंतर्गत थकबाकीवरील व्याज आणि विलंब आकार पूर्णपणे माफ होणार असून, मूळ थकबाकी एकरकमी भरल्यास २० टक्क्यांपर्यंत अतिरिक्त सवलत मिळणार आहे. १५ डिसेंबरपर्यंत एकरकमी भरणा करणाऱ्यांना विशेष ‘अर्ली बर्ड रिबेट’चाही लाभ मिळेल. ग्राहकांना मूळ थकबाकी एकरकमी किंवा हप्त्यांनी भरण्याची सुविधा आहे. लघुदाब ग्राहकांसाठी ५० टक्के आगाऊ रक्कम भरल्यानंतर उर्वरित रकमेस सहा समान व्याजमुक्त हप्ते उपलब्ध आहेत. उच्चदाब ग्राहकांनाही तीन ते सहा व्याजमुक्त हप्त्यांची सुविधा आहे. ऑनलाइन पोर्टल आणि मोबाईल ॲपद्वारे अर्ज करता येणार असून, योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.