चमत्काराचा दावा करणाऱ्या
फलज्योतिषावर कारवाई करा
महाराष्ट्र अंनिसची शहर पोलिस आयुक्तांकडे मागणी
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १२ : नवरात्रीत मंत्रसिद्ध केलेला काळा धागा उजव्या मनगटावर बांधल्याने नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन रखडलेल्या कामांत यश मिळते, असा दावा सोशल मीडियावर करणाऱ्या फलज्योतिषावर कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सोशल मीडियावरील संदेशानुसार, हा धागा ९०० रुपयांना विकला जात असून, पैसे बँक खात्यात जमा झाल्यानंतर तो पोस्टाने पाठवला जातो. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधिताचे बँक खाते सील करावे, अशी मागणी समितीने केली आहे. या माध्यमातून हजारो लोकांची आर्थिक फसवणूक झाल्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे. चमत्कारसदृश दाव्यांची वैज्ञानिक कसोटीवर सिद्धता देणाऱ्यांसाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने २१ लाख रुपयांचे पारितोषिक जाहीर केले आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी स्वतंत्र पथक स्थापन करून कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात केली आहे.
निवेदनावर समितीचे राज्य प्रधान सचिव डॉ. टी. आर. गोराणे, राज्य सदस्य कृष्णा चांदगुडे आणि रंजन लोंढे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
फोटो : H32138
नाशिक : शहर गुन्हेशाखेचे उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांना निवेदन देताना महाराष्ट्र अंनिसचे डॉ. टी. आर. गोराणे, कृष्णा चांदगुडे, रंजन लोंढे.