फोटो : H33754, H33755
दत्ताकाका उगावकर यांना
पक्षीमित्र जीवनगौरव पुरस्कार
नाशिक, ता. २८ : ‘महाराष्ट्र पक्षिमित्र’ तर्फे देण्यात येणाऱ्या २०२६ च्या पक्षिमित्र पुरस्कारांची घोषणा झाली असून, यंदा पक्षिमित्र जीवनगौरव पुरस्कार निफाड येथील दत्ताकाका उगावकर, र पत्रकारिता पुरस्कार प्रा. आनंद बोरा यांना जाहीर झाला आहे. इतर पुरस्कारांपैकी पक्षीसंवर्धन व शुश्रूषा पुरस्कार ताडदेव, मुंबई येथील मेघना दुर्वे मिश्रा यांना, पक्षी जनजागृती पुरस्कार ताडोबा चंद्रपूर येथील पक्ष्यांचे आवाज काढून पक्षी संवर्धनाची जनजागृती करणारे सुमेध वाघमारे, तसेच पेठ वडगाव येथील निसर्गप्रेमी मित्रमंडळ या संस्थेस जाहीर झाला आहे. पक्षी संशोधन पुरस्कार या गटातील पुरस्कार यावर्षी सोलापूर येथील राहुल वंजारी यांना जाहीर झाला आहे. यंदा प्रथमच दिला जाणारा पहिला पक्षी पत्रकारिता पुरस्कार नाशिक येथील पक्षीमित्र प्रा. आनंद बोरा व अकोला येथील विश्वास देशमुख यांना जाहीर झाला. रोख रक्कम, मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्कारांचे वितरण २६ व २७ डिसेंबर दरम्यान नाशिक येथे होणाऱ्या ३९ व्या महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलनात करण्यात येणार आहे. अशी माहिती महाराष्ट्र पक्षिमित्रतर्फे संस्थेचे अध्यक्ष डॉ. जयंत वडतकर यांनी दिली आहे.