(पान १ ला ॲंकर)
फोटो: NSK26H31657
नंदुरबार : बैठकीत बोलताना चित्रा कुलकर्णी. शेजारी अश्विनी सानप, नमन गोयल.
--------------
जिल्ह्यातील प्रलंबित प्रकरणाचा निपटारा करावा
चित्रा कुलकर्णी यांच्या प्रशासकीय विभागांना सूचना
सकाळ वृत्तसेवा
नंदुरबार, ता. ७ : महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत अधिसूचित सेवा संबंधित प्रशासकीय विभागांनी विहित कालावधीत नागरिकांना सेवा देऊन प्रलंबित प्रकरणांचा तत्काळ निपटारा करावा, असे निर्देश राज्य लोकसेवा हक्क आयोगाच्या नाशिक विभागाच्या आयुक्त चित्रा कुलकर्णी यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी (ता. ७) महाराष्ट्र लोक सेवा हक्क अधिनियमाच्या अंमलबजावणीबाबत आयुक्त चित्रा कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी त्या बोलत होत्या. या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, पोलिस अधीक्षक अश्विनी सानप, अपर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, निवासी उपजिल्हाधिकारी आशा संघवी, राज्य लोकसेवा हक्क आयोग कार्यालयाचे उपसचिव मिलिंद निकम, महाआयटी जिल्हाव्यवस्थापक योगेश पाटील, जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक जयेश खैरनार आदी अधिकारी उपस्थित होते.
श्रीमती कुलकर्णी म्हणाल्या, नागरिकांना अधिसूचित सेवा विहीत कालावधीमध्ये उपलब्ध करुन द्याव्यात. सेवा हमी देणाऱ्या विभागांनी प्रलंबित प्रकरणाचा त्वरित निपटारा करावा, अधिकाऱ्यांनी अर्जांची व अपिलांची नियमित पडताळणी करावी, अपिलांचा विहीत कालावधीत निपटारा करावा, पदनिर्देशित अधिकाऱ्यांनी विहित वेळेत सेवा द्यावी, सेवा नाकारतांना लेखी आदेश काढावेत, सेवा ऑनलाइन उपलब्ध करुन द्याव्यात, प्रथम व द्वितीय अपीलधारकांनी वेळेचे बंधन पाळावे, आपले सेवा पोर्टलवरील सेवेची माहिती प्रत्येक विभागानी घ्यावी, जिल्ह्याचा सिटीझन स्कोअर वाढविण्यासाठी फिडबॅक घेवून त्यावर उपाययोजना कराव्यात, लोकामध्ये फिडबॅकसाठी जनजागृती करावी, सर्व विभागानी जिल्ह्याचे मानांकन वाढविण्यासाठी प्रयत्न सामूहिक प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
अपर जिल्हाधिकारी श्री. गोगटे म्हणाले, सर्व विभागानी आपले मानांकन वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत. निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती संघवी यांनी सांगितले, जिल्ह्यातील सर्व विभागाची लोकसेवा हक्क अधिनियम अंतर्गत निकाली अर्ज, अपिले व प्रलंबित अर्जाची माहिती सादरीकरणाद्वारे मांडली.
अक्कलकुवा तालुक्याचा आढावा
अक्कलकुवा तालुक्याची स्वतंत्र आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी आशा संघवी, राज्य लोकसेवा हक्क आयोग कार्यालयाचे उपसचिव मिलिंद निकम, तहसीलदार विनायक घुमरे, गटविकास अधिकारी विजय अहिरे, तालुका कृषी अधिकारी एस. सी. नामदास, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता सोमनाथ पवार, महाआयटीचे जिल्हा व्यवस्थापक योगेश पाटील, जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक
जयेश खैरनार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
--------