फोटो : B10766
सातपूर: कामगार उपायुक्त कार्यालयासमोर निदर्शने करताना बांधकाम कामगार संघटनेचे पदाधिकारी.
--
बांधकाम कामगारांच्या मागण्यासाठी आंदोलन
कामगार उपायुक्त कार्यालयासमोर जोरदार निदर्शने
सातपूर, ता. २८ : महाराष्ट्र राज्यातील बांधकाम कामगारांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सीटू प्रणीत राज्य बांधकाम कामगार संघटनेतर्फे कामगार उपायुक्त कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. सीटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा राज्याध्यक्ष डॉ. डी. एल. कराड यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या आंदोलनात कामगारांनी विविध मागण्यांसाठी घोषणाबाजी केली. आंदोलनानंतर कामगार उपायुक्त विकास माळी यांना निवेदन देण्यात आले.
कल्याणकारी योजना पूर्ववत सुरू कराव्यात, शैक्षणिक अर्थसाहाय्य पुन्हा सुरू करावे, ऑनलाइन नोंदणीची प्रक्रिया सोपी करावी, नोंदणीकृत कामगारांना आर्थिक मदत द्यावी, दिवाळी बोनस अनुदान म्हणून ४० हजार रुपये द्यावेत, मातृत्व लाभापोटी तीन हजार रुपये द्यावेत, मध्यान्ह भोजनासाठी पाच हजार रुपये द्यावेत, घरकुल योजनेअंतर्गत आठ लाख रुपयांचे साहाय्य द्यावे आणि मेडिक्लेम योजना पूर्ववत सुरू करावी, अशा विविध मागण्या या वेळी करण्यात आल्या. या वेळी डॉ. डी. एल. कराड म्हणाले की, बांधकाम कामगारांच्या मागण्यांसाठी नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात मुंबई व दिल्ली येथे विराट मोर्चे काढण्याचे नियोजन असून आंदोलनांमध्ये कामगारांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले. आंदोलनात अध्यक्ष सीताराम ठोंबरे, चिटणीस देवीदास आडोळे, जनरल सेक्रेटरी सिंधूताई शार्दुल, मोहन जाधव, अनिल गोसावी, प्रभाकर पेंढारे, सुनील गमे, नीलेश मगर, पुरुषोत्तम गायकवाड, संजय पवार, राहुल गायकवाड, गौतम कोंगळे, दत्तू शिंदे, ज्ञानबा गायकवाड, सुखदेव अहिरे, संदीप गावीत, संदीप रणशेवरे, गणेश गावंडे, अर्जुन वानखेडे, विकास खैरे यांच्यासह रूपाली पेढेकर, छाया जाधव, भारती आल्हाटे आदी बांधकाम कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
AT26B10766