(पान ४ ला ॲंकर)
KPD26B13435
नगाव : शेतकऱ्यांशी संवाद साधतांना महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे. शेजारी पालकमंत्री जयकुमार रावल, आमदार राम भदाणे आदी.
---------
दुष्काळ निवारण्यासाठी प्रभावी उपाययोजना
महसूलमंत्री बावनकुळे : नगावला दुष्काळग्रस्तांशी भावनिक संवाद
सकाळ वृत्तसेवा
कापडणे, ता. ५ : शेतकरी हा देशाचा कणा आहे. दुष्काळी परिस्थिती कठीण असली तरी घाबरू नका, सरकार पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. पाणी व चाराटंचाईवर ठोस उपाययोजना केल्या जातील. निवडणुकीत दिलेली सर्व वचने सरकार पूर्ण करेल, असा ठाम विश्वास महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.
नगाव (ता. धुळे) येथील माजी आमदार अण्णासाहेब द. वा. पाटील शैक्षणिक संकुलात शेतकरी व शेतमजुरांशी संवाद साधताना ते बोलत होते. या वेळी पालकमंत्री जयकुमार रावल, आमदार राम भदाणे, माजी खासदार डॉ. सुभाष भामरे, आमदार अमरीशभाई पटेल, खासदार स्मिता वाघ, भाजपचे सरचिटणीस बाळासाहेब भदाणे, संघटन सरचिटणीस भाऊसाहेब देसले, जिल्हा उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, शुभांगी पाटील, लातूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल केंद्रे, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रावसाहेब गिरासे आदी उपस्थित होते.
पालकमंत्री रावल म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार दुष्काळाची जबाबदारी पूर्ण यशस्वी पार करेल. आमचा शिंदखेडा आणि धुळे हा कायमस्वरूपी दुष्काळी भाग आहे. आमचे सिंचनाचे प्रश्न जर सुटले तर जीवन बदलेल. शंभर वर्षांपासून दुष्काळाचा सामना करतोय. तुम्ही दुष्काळाचे प्रमुख मंत्री म्हणून आले, आम्हाला आशा आणि अपेक्षा आहे की तुमचे निर्णय आमचे जीवन बदलू शकेल. आमदार भदाणे म्हणाले, आमचा शिंदखेडा- धुळे हा कायमस्वरूपी दुष्काळी भाग आहे. सिंचनाचे प्रश्न सुटले तर दुष्काळ कायमचा संपेल.
आश्वासनांची पूर्ती करणार
मंत्री बावनकुळे म्हणाले, राम भदाणेंच्या रूपाने धुळे ग्रामीणला सोन्यासारखा आमदार मिळाला आहे. तो सर्व मंत्र्यांचा लाडका आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याची प्रत्येक मागणी पूर्ण करतात. दुष्काळ आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलताना मंत्री बावनकुळे यांनी सरकारच्या संकल्पनाम्याचा उल्लेख केला. ते म्हणाले, निवडणुकीत आम्ही वचन दिले होते. त्यानुसार शेतकऱ्याचचे कर्ज माफ केले. वीज बिल मोफत केले. पण दुष्काळाची परिस्थिती कठीण आहे. तरीही विधानसभेत दिलेली प्रत्येक वचन सरकार पूर्ण करेल.