स्थापत्य सहायक पदासाठी
आयटीआयधारकांना संधी द्या
नियमांत बदलाची ग्रामीण विद्यार्थ्यांची मागणी
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १६ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा २०२६ मधील पदसंख्या ५ हजार ७०७ वरून वाढवून १६ हजार ७१७ केली आहे. या परीक्षेत सार्वजनिक बांधकाम आणि जलसंपदा विभागातील स्थापत्य अभियांत्रिकी सहायक गट-क पदांचाही समावेश आहे. मात्र, या पदासाठी लागू केलेल्या नवीन सेवा प्रवेश नियमांमुळे आयटीआयधारक उमेदवारांना संधीपासून वंचित राहावे लागणार असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे. या पदासाठी स्थापत्य पदविका व पदवीसोबतच आयटीआय अभ्यासक्रमही पात्र ठरवावा, अशी मागणी होत आहे.
५ मे २०२६ रोजी जाहीर झालेल्या नवीन सेवा प्रवेश नियमानुसार या पदासाठी स्थापत्य अभियांत्रिकी शाखेतील पदविका किंवा पदवी हीच शैक्षणिक पात्रता निश्चित करण्यात आली आहे. मात्र, २०२३ मधील सरळसेवा भरतीत स्थापत्य अभियांत्रिकी सहायक, बांधकाम पर्यवेक्षक यांसारखे आयटीआय अभ्यासक्रम पूर्ण केलेले उमेदवारही पात्र होते. या अभ्यासक्रमांमध्ये पदविका व पदवी अभ्यासक्रमाशी ७० टक्क्यांपेक्षा अधिक समानता असल्याने आयटीआयधारकांनाही संधी मिळावी, अशी विद्यार्थ्यांची भूमिका आहे. यासंदर्भात २०२३ मध्ये जलसंपदा विभागाला स्पर्धा परीक्षा समन्वय समितीमार्फत निवेदन देण्यात आले होते. तसेच गेल्या पाच-सहा महिन्यांपासून मुख्यमंत्री कार्यालयाकडेही ई-मेलद्वारे पाठपुरावा सुरू आहे. हे निवेदन सामान्य प्रशासन विभागाकडे कार्यवाहीसाठी पाठविल्याचे उत्तर मिळाले; मात्र अद्याप सुधारित सेवा प्रवेश नियम जाहीर झालेले नाहीत.
चौकट
‘एक हजार पदांची भरती करा’
आगामी जिल्हा परिषद भरतीतही आयटीआयधारकांना अपात्र ठरवू नये, सर्व जिल्हा परिषदांमध्ये मिळून किमान एक हजार पदांची भरती करावी आणि सर्व पदांची केंद्रीकृत जाहिरात ग्रामविकास विभागाने प्रसिद्ध करावी, अशी मागणी निवृत्त स्थापत्य अभियंता प्रा. विनायक काळे यांनी केली आहे.