(पान १ ला सेकंड मेन)
फोटो क्रमांक : NSK26H31369
अजंग- कासविहीर (ता. धुळे) : पावसाने पाठ फिरवल्याने करपलेल्या आणि वाया गेलेल्या कापूस पिकाची पाहणी करीत शेतकऱ्यांशी संवाद साधतान महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे. शेजारी पालकमंत्री जयकुमार रावल, आमदार राम भदाणे, डॉ. सुभाष भामरे, आदींसह शेतकरी.
------
संकटात शासन पाठीशी; पंचनामे अचूक करा
मंत्री बावनकुळेंच्या सूचना; अजंग- कासविहीर परिसरात दुष्काळी पाहणी
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. ४ : पावसाने पाठ फिरवल्याने करपलेली पिके आणि हातातून निसटत चाललेले खरीप हंगामाचे उत्पन्न यामुळे चिंतेत असलेल्या अजंग-कासविहीर (ता. धुळे) परिसरातील शेतकऱ्यांच्या वेदना महसूलमंत्री तथा दुष्काळ निवारण समिती उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी थेट शेताच्या बांधावर जाऊन जाणून घेतल्या. सोयाबीन, कापूस, तूर आणि मका पिकांच्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करत या संकटाच्या काळात शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल, आमदार राम भदाणे, माजी केंद्रीय मंत्री डॉ. सुभाष भामरे, माजी आमदार कुणाल पाटील, जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बाबासाहेब बेलदार, अपर जिल्हाधिकारी संदीप पाटील, उपविभागीय अधिकारी रोहन कुवर, तहसीलदार अरुण शेवाळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुरज जगताप, जिल्हा कृषी अधिकारी कावेरी राजपूत व तालुका कृषी अधिकारी माधुरी गायकवाड आदी उपस्थित होते.
मंत्री बावनकुळे म्हणाले, की नुकसानग्रस्त एकही पात्र शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये. पिकांच्या नुकसानीचे पंचनामे वस्तुनिष्ठ, अचूक आणि वेळेत पूर्ण करावेत. एनडीआरएफ, एसडीआरएफ तसेच पीकविमा योजनेच्या माध्यमातून मदत पोहोचविण्यासाठी प्रशासनाने संवेदनशील राहावे. जिल्ह्यात सुमारे दोन लाख हेक्टरवर कापूस आणि एक लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावर मका लागवड झाली असून, ७० टक्के पंचनाम्यांचे काम पूर्ण झाले असल्याचे या वेळी अधिकाऱ्यांनी सांगितले.
-
चाराचे नियोजन करा
दुष्काळाचा परिणाम केवळ उत्पादनापुरता मर्यादित नसून शेतमजुरांच्या हाताला काम, जनावरांसाठी चारा आणि पिण्याच्या पाण्याचे नियोजन आतापासूनच करण्याचे निर्देश त्यांनी दिले. कार्यकारी अभियंता जयश्री सार्वे व गटविकास अधिकारी गणेश चौधरी यांच्या उपस्थितीत रोजगार हमी योजना आणि जलसंधारणाची कामे हाती घेण्याचे स्पष्ट करण्यात आले. धुळ्यातील पाण्याचा प्रत्येक थेंब धुळ्यातच अडवूया, असे आवाहन त्यांनी केले.
-
कर्जवसुलीला मज्जाव
दुष्काळामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना बँकांनी कर्जवसुलीसाठी अनावश्यक तगादा लावू नये, अशा कडक सूचना देण्यात आल्या आहेत. संकटाचा गैरफायदा घेणाऱ्या अवैध सावकारीविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही मंत्री बावनकुळे यांनी दिला. मुख्यमंत्री यांच्या निर्देशानुसार ११ मंत्र्यांची मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्यात आली असून, याद्वारे योग्य उपाययोजना केल्या जातील, असे त्यांनी सांगितले.