पान तीन मेन
(सकाळ विशेष लोगो वापरावा)
राज्यातील महामार्गांवरील अपघाताना बसणार आळा
अकराशे पोलिसांची २४ तास गस्त; नाशिकसह २५ जिल्ह्यांतील यंत्रणा सक्रिय
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ४ : राज्यातील समृद्धी महामार्ग, मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे आणि प्रमुख राष्ट्रीय महामार्गांवर सतत होणारे भीषण अपघात, गाड्यांचा अतिवेग, धोकादायक लेन कटिंग आणि चालकांचा निष्काळजीपणा रोखण्यासाठी, तसेच महामार्गावरील आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयाद्वारे महामार्ग सुरक्षा पथकातील (एचएसपी) सुमारे अकराशे अधिकारी व कर्मचाऱ्यांना पुढील सहा महिन्यांसाठी मुदतवाढ मंजूर केली असून, या निर्णयामुळे २५ हून अधिक जिल्ह्यातील महामार्गांवर २४ तास खडा पहारा कायम राहणार आहे.
सप्टेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी आणि वर्षाअखेरच्या सुट्ट्यांचा समावेश असतो. या काळात सर्वच महामार्गांवर वाहनांची मोठी वर्दळ असते. जर ही मुदतवाढ मिळाली नसती, तर गस्त आणि आपत्कालीन क्रेन सेवा ठप्प होण्याचा धोका होता. परंतु, या निर्णयामुळे सणांच्या काळात वाहतूक कोंडी नियंत्रण आणि सुरक्षेचे नियोजन अधिक मजबूत होणार आहे.
-------
वेग आणि ''लेन कटिंग''वर कडक कारवाई
महामार्गांवर होणाऱ्या भीषण अपघातांमागे अतिवेग आणि चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करणे ही मुख्य कारणे आहेत. शासनाने १ सप्टेंबर २०२६ ते २८ फेब्रुवारी २०२७ या कालावधीसाठी ही मुदतवाढ दिल्याने स्पीड गन व आधुनिक ट्रॅफिक कंट्रोल यंत्रणेसह पोलीस पथके महामार्गावर सातत्याने गस्त घालत राहतील. यामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांसह हवालदार, शिपाई आणि चालकांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे.
नाशिक-पुणे, नाशिक-मुंबई, नाशिक-गुजरात या मार्गांसह खंडाळा, बोरघाट व इतर धोकादायक वळणांवर अपघातांची शक्यता अधिक असते. त्यामुळे बोरघाट आणि चिंचोटी भागातील क्रेन चालक व तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या पदांनाही मुदतवाढ देण्यात आली आहे. यामुळे अपघात किंवा वाहन बंद पडल्यास रस्ता मोकळा करणे आणि जखमींना वेळेत वैद्यकीय मदत पोहोचवणे अधिक जलद गतीने शक्य होणार आहे.
-----------
नाशिक ग्रामीणमध्ये १०९ पदे सक्रिय
या निर्णयाचा सर्वाधिक फायदा नाशिक (ग्रामीण), अहिल्यानगर, धुळे, जळगाव, पुणे (ग्रामीण), ठाणे आणि रायगड या भागांतील महामार्ग सुरक्षा केंद्रांना होणार आहे. यामध्ये ठाणे ग्रामीणमध्ये १७१, पुणे ग्रामीणमध्ये ११५, तर नाशिक ग्रामीणअंतर्गत १०९ पदे सक्रिय राहणार आहेत.
दृष्टीक्षेपात निर्णय
एकूण मुदतवाढ दिलेली पदे : १,१०१
मुदतवाढ कालावधी : १ सप्टेंबर २०२६ ते २८ फेब्रुवारी २०२७
प्रमुख पदे : अपर पोलिस महासंचालक (१), पोलिस अधीक्षक (३), उपअधीक्षक (३), तसेच निरीक्षक, उपनिरीक्षक, हवालदार, शिपाई, चालक व तांत्रिक मदतनीस.
प्रमुख जिल्ह्यांतील पदसंख्या :
ठाणे ग्रामीण (१७१), पुणे ग्रामीण (११५), नाशिक ग्रामीण (१०९), अहमदनगर (५१), अमरावती (४२), छत्रपती संभाजीनगर (४१), जळगाव (३६), नांदेड (३६), रायगड (३४), धुळे (२२).