पान-४ मेन
चारा, पशुधन किंवा तलावाचे चित्र घ्यावे....
तलावांच्या गाळपेरा क्षेत्रात चारा पेरणी
पावणेसात लाख पशुधनासाठी दरमहा ८७ हजार टन चाऱ्याची गरज
नंदुरबार, ता. १६ : जिल्ह्यात यंदा सामान्य पर्जन्यमानाच्या केवळ ५० टक्के पाऊस झाला आहे. त्याचा खरिपावर परिणाम होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात पशुधनासाठी दरमहा ८७ हजार टन चाऱ्याची गरज असून, संभाव्य चाराटंचाई लक्षात घेऊन जिल्ह्यातील धरणे आणि तलावांच्या गाळपेरा क्षेत्रात चारा पेरणी करण्याचे नियोजन पशुसंवर्धन विभागाने सुरू केले आहे.
..................
पीक अवशेषांचे संकलन
संभाव्य चाराटंचाईच्या काळात चारा उपलब्ध व्हावा, यासाठी पशुसंवर्धन, कृषी तसेच वन विभागाशी समन्वय साधला जात आहे. पशुपालकांना चारा बचतीचे महत्त्व पटवून दिले जात आहे. कडबा, पेंढा, भुसा आणि धाटे यांसारख्या पिकांचे अवशेष जाळू नये. अवशेषांवर प्रक्रिया करून त्याचा पशुखाद्य म्हणून वापर करावा. कडबा आणि एकदल चारा जनावरांना कुट्टी करून द्यावा, असे आवाहन केले जात आहे. यूरिया व गूळ प्रक्रियेची प्रात्यक्षिके पशुसंवर्धन विभागातर्फे घेण्यात येत आहेत.
मुरघास निर्मितीला प्रोत्साहन
चारा साक्षरता अभियान जिल्ह्यात राबविण्यात येत असून, मुरघास आणि हायड्रोपोनिक्स पद्धतीने चारा निर्मितीचे महत्त्व पशुपालकांना पटवून देण्यात येत आहे. अझोला बेडच्या माध्यमातून चारानिर्मितीबाबत मार्गदर्शन केले जात आहे. धरणे व तलावांतील पातळी कमी झाल्यानंतर गाळपेरा क्षेत्रात चारा पिकांची पेरणी करण्यात येणार आहे.
वैरण बियाण्यांसाठी एक कोटी ६० हजारांचा प्रस्ताव
कमी पावसामुळे गहू, हरभरा यांसारख्या रब्बी पिकांचे क्षेत्र घटण्याची शक्यता आहे. त्यामुळे सिंचन सुविधा असलेल्या शेतकऱ्यांनी रब्बी व उन्हाळी हंगामात चारा पिकांची लागवड करावी. वैरण विकास योजनेंतर्गत शेतकऱ्यांना १०० टक्के अनुदानावर वैरण बियाणे वितरित करण्यासाठी एक कोटी ६० लाख रुपयांच्या अतिरिक्त निधीची मागणी पशुसंवर्धन विभागाने जिल्हा नियोजन समितीकडे केली आहे.
चाऱ्याच्या वाहतुकीस बंदी
जिल्ह्यात उत्पादित होणारा चारा स्थानिक पशुधनालाच उपलब्ध राहावा, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी चाराबंदीचे आदेश जारी केले आहेत. जिल्ह्यातील चाऱ्याची परजिल्ह्यात किंवा परराज्यात वाहतूक होऊ नये, यासाठी विविध तपासणी नाक्यांवर दक्षता घेतली जात आहे. आगीच्या घटनांमुळे चारा वाया जाऊ नये, यासाठी पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी, कर्मचारी शेतकरी आणि पशुपालकांना मार्गदर्शन करीत आहेत.
...............
कोट
चाराटंचाई टाळण्यासाठी उपलब्ध संसाधनांचा कार्यक्षम वापर आवश्यक आहे. शेतकरी आणि पशुपालकांनी उपलब्ध पीक अवशेषांवर प्रक्रिया करावी. सकस चारा निर्मितीला प्राधान्य द्यावे.
डॉ. मित्ताली सेठी, जिल्हाधिकारी
.......
सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी शेतात रब्बी व उन्हाळी हंगामात चारा पिकांची लागवड करावी. उपलब्ध चाऱ्याचे योग्य नियोजन करावे. पर्यायी चारानिर्मितीतून जिल्ह्यातील पशुधनाची चाऱ्याची गरज भागविण्यासाठी सहकार्य करावे.
डॉ. संजय खाचणे, जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय
--------------------
जिल्ह्यातील एकूण पशुधन ः सहा लाख ७० हजार
गाय व म्हैस- दोन लाख ९२ हजार
वासरे व पारडे- ४० हजार
शेळ्या व मेंढ्या- तीन लाख ४० हजार
------------------
चाऱ्याची दरमहा गरज- ८७ हजार टन
संभाव्य कोरडा चारानिर्मिती- नऊ लाख ८२ हजार टन
उपलब्ध चारा पुरण्याचा काळ- सुमारे १९० ते १९५ दिवस
--------------