esakal | भौगोलिक चिन्हांकन नोंदणीत महाराष्ट्राचा २२ टक्के हिस्सा! देशात ९० शेतमालाची नोंदणी
sakal

बोलून बातमी शोधा

geographical-marking

भौगोलिक चिन्हांकन नोंदणीत महाराष्ट्राचा २२ टक्के हिस्सा

sakal_logo
By
महेंद्र महाजन

नाशिक : दररोजच्या न्याहरीमध्ये स्थान मिळविलेल्या खाकराला आता ज्वारीच्या भाकरीने ‘मार्केट’मध्ये मागे टाकले. भाकरीच्या सोबत चटकर चटणी दिली जातेय. भौगोलिक चिन्हांकनाच्या नोंदणीतून हा मोठा फरक तयार झालाय. मंगळवेढ्याच्या ज्वारीची नोंद झाली आहे. देशातील ३१ उत्पादनांची ३७० भौगोलिक चिन्हांकन नोंदणी झाली असून, त्यात कृषी आणि फलोत्पादन क्षेत्रातील ९० उत्पादनांचा समावेश आहे. त्यामध्ये महाराष्ट्राचा २२ टक्के हिस्सा असून, २६ उत्पादनांपैकी कृषी आणि फलोत्पादनातील २० उत्पादने नोंदविली गेली आहेत. (Maharashtra-share-in-geographical-marking-registration-marathi-news)

ज्वारीच्या भाकरीने खाकराचे ‘मार्केट’ टाकले मागे

भौगोलिक चिन्हांकन हे भौगोलिक क्षेत्राशी निगडित आहे. नैसर्गिकरीत्या आणि मानवी प्रयत्नातून उत्पादित कृषिमालाची ओळख त्याद्वारे होत असून, गुणवत्तेतील सातत्य व त्यांच्यामधील विशेष गुणधर्माचे जतन करण्यासाठी हे चिन्हांकन उपयोगी ठरत आहे. तसेच भौगोलिक चिन्हांकनप्राप्त फलोत्पादन पिकांसाठी ब्रॅन्डिंगद्वारे विक्री आणि विक्रीसाठी अधिकृत वापर करण्यासाठी नोंदणी आवश्‍यक आहे. महाराष्ट्र फलोत्पादनामध्ये अग्रेसर असून, विविध भागांमध्ये उत्कृष्ट दर्जाची फळे व भाजीपाल्याचे उत्पादन घेतले जाते. फळे आणि भाजीपाल्याची ओळख त्याच्या भागातील वैशिष्ट्यपूर्ण बाबींसाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे पिकाच्या गुणवत्तेस हमीभाव मिळण्यासाठी भौगोलिक चिन्हांकन नोंदणीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

भौगोलिक चिन्हांकन दर्जा

भौगोलिक चिन्हांकन नोंदणीने दर्जा प्राप्त झालेली राज्यातील पिके : महाबळेश्‍वरची स्ट्रॉबेरी, नाशिकची द्राक्षे व वाइन आणि लासलगावचा कांदा, नागपूरची संत्री, जळगावचे भरीत वांगे आणि केळी, सासवडचे अंजीर, सोलापूरचे डाळिंब, सांगलीचा बेदाणा आणि हळद, जालन्याची मोसंबी, बीडचे सीताफळ, वेंगुर्ल्याचा काजू, घोलवड-डहाणूचे चिकू, मराठवाड्यातील केशर आंबा, कोकणातील हापूस आंबा, सातारामधील वाघ्या घेवडा, रत्नागिरी व सिंधुदुर्गचे कोकण, नागपूर-भिवापूरची मिरची, वर्धा-वायगावची हळद, कोल्हापूरचा गूळ आणि आजराचा घनसाळ तांदूळ, नवापूरची भिवापूर तूरडाळ, पुण्याचा आंबेमोहर तांदूळ. याशिवाय सोलापूरची चादर आणि टॉवेल, कोल्हापूर चप्पल, पुणेरी पगडी, औरंगाबादचा पैठणी शालू, वारली पेंटिंग. अधिकृत वापर आणि नोंदणीसाठी आवश्‍यक असणारी कागदपत्रे याप्रमाणे भौगोलिक चिन्हांकित पिकांसाठी अधिकृत वापर करता यावा म्हणून नोंदणी करण्यासाठी जीआय-थ्रीएमध्ये अर्ज करावा लागतो. अर्जासोबत सातबारा स्वतःची साक्षांकित प्रत आणि पिकाची ट्रेसिबिलिटी नेटअंतर्गत नोंदणी केल्याच्या नोंदणीची प्रत लागते. उत्पादक असल्याचे व त्या दर्जाचे उत्पादन करण्यासाठी शेतकऱ्याचे हमीपत्र द्यावे लागते.

प्रश्‍न : जागतिक व्यापार करारामध्ये कृषी विषयाचा पहिल्यांदा कधी समावेश झाला?

उत्तर : १९९५ मध्ये कृषी विषयाचा पहिल्यांदा समावेश झाला.

प्रश्‍न : जागतिक व्यापार करारांतर्गत महत्त्वाचा करार कोणता?

उत्तर : व्यापार संबंधित बौद्धिक मालमत्ता अधिकार हा करार होय.

प्रश्‍न : करारांतर्गत काय महत्त्वाचे आहे?

उत्तर : उत्पादनाचे पेटंट डिझाइन आणि त्याचे भौगोलिक चिन्हांकन आणि ट्रेडमार्क नोंदणी महत्त्वाची आहे.

प्रश्‍न : संसदेची करारानुसार कधी मान्यता मिळाली?

उत्तर : भौगोलिक क्षेत्राशी निगडित उत्पादित मालास संरक्षण देण्यासाठी संसदेने ३० डिसेंबर १९९१ ला भौगोलिक प्रदर्शन नोंदणी व संरक्षण अधिनियम १९९९ मंजूर केला.

प्रश्‍न : भौगोलिक चिन्हांकन नोंदणीचे काम कोणामार्फत केले जाते?

उत्तर : बौद्धिक हक्क म्हणून कृषिमालाला भौगोलिक चिन्हांकन नोंदणी करण्याचे काम चेन्नईच्या केंद्र सरकारच्या जिऑग्राफिलक इंडिकेशन नोंदणी कार्यालयातर्फे केली जाते.

प्रश्‍न : भौगोलिक चिन्हांकन नोंदणीचे फायदे कोणते?

उत्तर : कायदेशीर संरक्षण प्राप्त होते. अनधिकृत वापरास रोखता येते. निर्यातीसाठी अधिक संधी उपलब्ध होतात. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर ब्रॅन्ड होण्यास मदत होते. अधिक आर्थिक उत्पन्न मिळण्यास मदत होते.

प्रश्‍न : भौगोलिक चिन्हांकन नोंदणीसाठी कोण अर्ज करू शकतात?

उत्तर : कोणतीही नोंदणीकृत व्यक्ती समूह अथवा उत्पादन उत्पादक संघटना नोंदणीसाठी अर्ज करू शकते. वैयक्तिक स्वरूपात करता येत नाही. अर्जदार संस्था कोणतीही असली, तरी त्या पिकाच्या भौगोलिक क्षेत्रातील इतर शेतकरी वापर करू शकतात.

प्रश्‍न : नोंदणी किती वर्षांसाठी असते? नोंदणीनंतर काय करायचे?

उत्तर : नोंदणी दहा वर्षांसाठी असते. त्यानंतर नूतनीकरण आवश्‍यक असते. नोंदणी करण्यासोबत संबंधित मालाच्या गुणवत्तेमध्ये सातत्य राखावे लागते. बिगरसभासदांसाठी कार्यवाही आवश्‍यक असते. ब्रॅन्ड विकासासाठी अर्जदार संस्थेने काम करायचे.

प्रश्‍न : अर्जासाठीचा संपर्क कोणता?

उत्तर : रजिस्टार, जिऑग्राफिकल इंडिकेशन रजिस्ट्री ऑफिस, इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी इंडिया बिल्डिंग, जीएसटी रोड चेन्नई (पिन कोड- ६०००३२) या पत्त्यावर अर्ज पाठवावा लागतो. ०४४-२२५०२०९२ हा क्रमांक संपर्कासाठी आहे.

भौगोलिक चिन्हांकन नोंदणीच्या कामाला राज्यातील फलोत्पादन आणि निर्यात कक्षातर्फे २०१४-१५ मध्ये सुरवात झाली. २०१६-१७ मध्ये १३ पिकांना नोंदणी मिळाली. त्या वेळी ही नोंदणी काय उपयोगाची, असा प्रश्‍न उपस्थित करण्यात येत होता. आता मात्र त्याचे फायदे दिसू लागले आहेत. हापूस आंबा, चिकू पहिल्यांदा जीआय लेबल लावून इंग्लंडमध्ये निर्यात झाली. जळगावची केळी दुबईला गेली. -गोविंद हांडे, तांत्रिक सल्लागार (निर्यात), कृषी आयुक्तालय, पुणे

loading image