फोटो : NSK26H34181
ठाणे : महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या बैठकीस उपस्थित पुरुषोत्तम काळे, अविनाश तालापल्लीवार, मच्छिंद्र गुरमे, रमेश क्षीरसागर, राकेश आव्हाड, वैशाली काकडे, सुरेखा ताजवे.
------------------
संत रविदास महाराजांच्या विचारांचा करणार जागर
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या बैठकीत निर्णय
सकाळ वृत्तसेवा
नंदुरबार, ता. २ : एबीआरएसम संलग्न असलेल्या महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या महाराष्ट्र प्रांत कार्यकारिणीची बैठक ठाणे येथे प्रांत कार्याध्यक्ष मच्छिंद्र गुरमे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत आगामी वर्ष ‘संघटन विस्तार वर्ष’ म्हणून राबवून संत रविदास महाराजांच्या विचारांचा जागर करण्याचा संकल्प करण्यात आला.
बैठकीत संघटनेचे जाळे मजबूत करणे, सभासद नोंदणी वाढविणे, जिल्हा व तालुका शाखांचा विस्तार करणे आणि शिक्षकांचे प्रश्न प्रभावीपणे सोडविण्याचे निर्णय घेण्यात आले. जानेवारी महिन्यात राज्यभर तालुकास्तरीय मेळावे घेऊन कर्तव्य बोध कार्यक्रम, महिला संमेलने, प्रत्येक जिल्ह्यात एक रक्तदान शिबिर घेण्याचा निर्णय झाला. संत रविदास महाराज यांच्या ६५० व्या जयंतीनिमित्त जिल्हास्तरीय कार्यक्रमांचे आयोजन करावे. जिल्हा शाखांनी शैक्षणिक व प्रशासकीय प्रश्नांवर सक्रिय भूमिका घ्यावी, याबाबत निर्णय झाले.
बैठकीला राज्यभरातील पदाधिकारी उपस्थित होते. यात प्रांत कार्यवाह पुरुषोत्तम काळे, प्रांत कोषाध्यक्ष अविनाश तालापल्लीवार, प्रांत कार्याध्यक्ष मच्छिंद्र गुरमे, रमेश क्षीरसागर, प्रांत सहकार्यवाह राकेश आव्हाड, प्रांत महिला आघाडी प्रमुख वैशाली काकडे, सहप्रमुख सुरेखा ताजवे यांच्यासह नंदुरबार जिल्हाध्यक्ष नितेंद्र चौधरी, राकेश आव्हाड, किरण घरटे, शरद घुगे आदींची उपस्थिती होती. नंदुरबारचे योगेश महाले यांची प्रांत प्रसिद्ध प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली.