राज्य नाट्य स्पर्धेत ''परीक्षकशाही'' संपणार!

राज्य नाट्य स्पर्धेत ''परीक्षकशाही'' संपणार!
Published on: 
राज्य नाट्य स्पर्धेतील ‘परीक्षकशाही’ संपणार स्पर्धांच्या परीक्षणासाठी पहिल्यांदाच अर्जप्रक्रिया सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २१ : महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धांच्या मूल्यमापनात वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेल्या ठराविक परीक्षकांची एकाधिकारशाही आता मोडीत निघणार आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत यंदा पहिल्यांदाच पारदर्शक ऑनलाइन अर्जप्रक्रिया सुरू केली आहे. यामुळे नाट्य क्षेत्रातील नव्या, सक्षम आणि अनुभवी कलावंतांना थेट परीक्षकाची भूमिका बजावण्याची संधी मिळणार आहे. सांस्कृतिक विभागातर्फे दर वर्षी हौशी मराठी, हिंदी, संस्कृत, संगीत, मराठी बालनाट्य, दिव्यांग बालनाट्य, एकांकिका आणि व्यावसायिक नाट्य स्पर्धा भरविल्या जातात. मात्र, यापूर्वी सांस्कृतिक विभागाकडून ठराविक संस्था किंवा यादीतील मोजक्याच ज्येष्ठ व्यक्तींकडे परीक्षणाची सूत्रे सोपवली जात असत. वाढते वय, प्रकृतीच्या समस्या आणि बदलत्या काळातील नाटकांचे आधुनिक विषय व तंत्रज्ञानापासून ज्येष्ठ परीक्षक दुरावलेले असणे, यामुळे या जुन्या पद्धतीवर सातत्याने टीका होत होती. हीच त्रुटी दूर करून स्पर्धांचा दर्जा उंचावण्यासाठी आणि काळाची पावले ओळखणाऱ्या परीक्षकांचा अनुभव स्पर्धक कलाकारांना मिळावा, यासाठी शासनाने ही नवीन अर्जप्रक्रिया अमलात आणली आहे. २५ ऑक्टोबरपर्यंत मुदत या प्रक्रियेंतर्गत परीक्षक होण्यासाठी कलावंताला किमान दहा किंवा त्याहून अधिक नाटकांमध्ये काम केल्याचा प्रत्यक्ष अनुभव असणे अनिवार्य आहे. तसेच कलावंतांना मिळवलेली पारितोषिके व पुरस्कारांचा तपशील अर्जात नमूद करावा लागणार आहे. पात्र कलावंतांना २५ ऑक्टोबरपर्यंत mahanatyaspardha.com या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज भरता येणार आहे. दरम्यान, यंदाच्या ६५ व्या हौशी मराठी नाट्य स्पर्धेला १६ नोव्हेंबरपासून २४ केंद्रांवर सुरुवात होत असून, त्यासाठी राज्यभरातून तब्बल ५४२ नाटकांच्या प्रवेशिका प्राप्त झाल्या आहेत. तर २३ वी बालनाट्य स्पर्धा राज्यातील दहा केंद्रांवर होणार आहे. त्यासाठी राज्यभरातून ६०१ प्रवेशिका प्राप्त झाल्या आहेत. या सर्व स्पर्धांना आता नव्या व अनुभवी परीक्षकांची ‘नजर’ लाभणार असल्याने नाट्य वर्तुळातून या निर्णयाचे स्वागत केले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com