आकृतीबंधातील अतिरिक्त
२८ कर्मचाऱ्यांचे समायोजन
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ८ : महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाच्या सुधारित आकृतीबंधामुळे काही पदे अतिरिक्त ठरली आहेत. या अतिरिक्त ठरलेल्या कर्मचाऱ्यांना इतर विभागात सामावून घेण्याची प्रक्रिया राबविली जात आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेत आज झालेल्या प्रक्रियेत २८ कर्मचाऱ्यांचे समुपदेशनाद्वारे समायोजन केले.
राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागाच्या सुधारित आकृतीबंध तयार करण्यात आला होता. यामुळे राज्यभरातच महिला व बालविकास विभागातील कर्मचाऱ्यांची संख्या कमी होत आहे. यामुळे विभागातील काही कर्मचारी अतिरिक्त ठरत आहेत. त्यानुसार जळगाव जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागातील २८ कर्मचारी अतिरिक्त ठरले होते. या सर्व कर्मचार्यांना इतर विभागातील रिक्त असलेल्या पदांवर पदस्थापना देण्यात आली आहे.
जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज चौधर यांच्या उपस्थितीत समुपदेशनाद्वारे ही प्रक्रिया राबविण्यात आली. यामध्ये कनिष्ठ सहाय्यक १६, विस्तार अधिकारी सांख्यिकी २, वरिष्ठ सहाय्यक लेखा ९ व शिपाई १ अशा २८ कर्मचाऱ्यांचे समायोजन करण्यात आले आहे.
चौकट
महिनाभराच्या पगाराचा प्रश्न रखडलेला
दरम्यान, आकृतिबंधात अतिरिक्त ठरल्याने या कर्मचाऱ्यांना मागील महिन्याचा पगार देखील मिळालेला नाही. आता अन्य विभागात पदस्थापना मिळाली असली तरी मागील महिन्याचा रखडलेला पगाराचा प्रश्न अद्याप कायम आहे. हा पगार कधी मिळणार याबाबत शासन स्तरावर निर्णय झाल्यानंतरच कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे.