वरिष्ठ महाराष्ट्र क्रिकेट संघात
ईश्वरी, प्रियंकाचा सहभाग
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १७ : येथील ईश्वरी सावकार व प्रियंका घोडके या खेळाडूंची वरिष्ठ महिला महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड झाली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) तर्फे २६ ऑक्टोबरपासून सुरत येथे आयोजित वरिष्ठ महिला टी-ट्वेंटी सामन्यांच्या स्पर्धेत या खेळाडू महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करतील.
ईश्वरी सावकार व प्रियंका घोडके या दोन्ही खेळाडूंनी यापूर्वीदेखील १९ व २३ वर्षांखालील वयोगटासह, वरिष्ठ महिला क्रिकेट संघात महाराष्ट्रातर्फे तसेच पश्चिम विभागाचेही प्रतिनिधित्व केले आहे. सलामीची फलंदाज ईश्वरीने १९ वर्षाखालील महाराष्ट्राचे कर्णधारपद भूषवले आहे. ईश्वरीची गेली काही वर्षे, महिलांच्या १९ तसेच २३ वर्षांखालील वयोगटात बीसीसीआयतर्फे आयोजित नॅशनल क्रिकेट अकादमीच्या राष्ट्रीय पातळीवरील हाय परफॉर्मन्स शिबिरासाठी निवड होत आली आहे. २०२२ मध्ये महिला टी-ट्वेंटी सामन्यांच्या चॅलेंजर ट्रॉफीसाठी १९ वर्षांखालील इंडिया ए संघाच्या उपकर्णधारपदी निवड झाली होती. त्या स्पर्धेत श्रीलंका व वेस्ट इंडीज संघाविरुद्ध चांगली कामगिरी केल्याने ईश्वरीची महाराष्ट्राच्या वरिष्ठ महिला क्रिकेट संघात नियमितपणे निवड होत आहे.
कर्णधार प्रियांका घोडके आघाडीची फलंदाज व ऑफ स्पीनर आहे. नोव्हेंबर २०१९ मध्ये पुदुचेरी येथे झालेल्या टी-ट्वेंटी सामन्यांच्या स्पर्धेत महाराष्ट्रातर्फे २३ वर्षांखालील महिला क्रिकेट संघाचे, प्रतिनिधित्व करताना प्रियांकाने फलंदाजीत उत्कृष्ट कामगिरी केली होती. २०१८-१९ च्या हंगामात, टी-ट्वेंटी सामन्यांच्या स्पर्धेत महाराष्ट्रातर्फे सर्वाधिक बळी घेतले होते.
आगामी स्पर्धेत २६ ऑक्टोबरला आसाम, २७ ऑक्टोबरला कर्नाटक, २९ ऑक्टोबरला चंदीगड, ३१ ऑक्टोबरला छत्तीसगड आणि १ नोव्हेंबरला बंगाल व ५ नोव्हेंबरला गोवा संघासोबत महाराष्ट्राची लढत होणार आहे.