Mahashivratri 2023 : सोमेश्वर महादेवाच्या दर्शनासाठी दूरवर रांगा; यात्रोत्सवातून लाखोंची उलाढाल
नाशिक : महाशिवरात्रीचे औचित्य साधत शिवभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या व निसर्गाच्या सानिध्यातील श्री सोमेश्वर (Someshwar) महादेवाच्या दर्शनासाठी रांगा दूरवर पोचल्या होत्या.
येथे भरलेल्या यात्रोत्सवातून सायंकाळपर्यंत लाखो रुपयांची उलाढाल झाली. (mahashivratri Queue far wide for darshan of lord Someshwar Mahadev nashik news)
देवस्थानतर्फे शिवभक्तांना खिचडी, केळीसह खजुराचे वाटप करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत गर्दी कायम होती. यंदाच्या गर्दीने मागील काही वर्षांच्या गर्दीचा उच्चांक मोडल्याचे दिसून आले.
महाशिवरात्रीनिमित्त शहरासह परिसरातील शिवालयात शिवभक्तांची प्रचंड गर्दी उसळली होती. मध्यरात्री साडेबारा वाजता सहाय्यक धर्मदाय उपायुक्त गुप्ते यांच्या हस्ते महापूजा झाली. तर, पहाटे अतिरिक्त सत्र न्यायाधीश रूपेश राठी यांच्या हस्ते महापूजा झाली.
या वेळी देवस्थानचे अध्यक्ष मुरलीधर पाटील, विश्वस्त हरीश शिंदे यांच्यासह सर्व विश्वस्त उपस्थित होते. पहाटे पाचच्या आरतीनंतर मंदिर भाविकांच्या दर्शनसाठी खुले करण्यात आले. यंदा दर्शनरांगा थेट मुख्य रस्त्यापर्यंत पोचल्या होत्या, यावरून गर्दीची कल्पना यावी.
हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?
महाशिवरात्रीनिमित्त भरलेल्या यात्रोत्सवात खेळणीसह विविध खाद्यपदार्थाचे स्टॉल्सही लावण्यात आले होते. त्या ठिकाणीही खवय्यांची मोठी गर्दी उसळली होती. औदुंबर लॉन्सच्या संचालकांकडून उपस्थित भाविकांना खजुराचे वाटप करण्यात आले.
याशिवाय देवस्थानतर्फे खिचडी, केळी यांचेही वाटप करण्यात आले. दर्शनासाठी रात्री उशिरापर्यंत रांगा कायम होत्या. सायंकाळनंतर गर्दी कमी होण्याऐवजी वाढल्याने मंदिर परिसरात पाय ठेवायलाही जागा नव्हती.
हायमास्टने उजळला परिसर
नवीन कांडेकर यांनी त्यांच्या वडीलांच्या स्मृतीप्रित्यर्थ सोमेश्वर मंदिर परिसरात दोन हायमास्टची भेट दिली. या हायमास्टमुळे मंदिर परिसर उजाळून निघाला होता.