NSK26H31573
जळगाव : महात्मा फुले कृषी विद्यापीठ (राहुरी) आणि जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेड यांच्यात सामंजस्य कराराप्रसंगी कुलगुरू डॉ. विलास खर्चे, जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन, डॉ. प्रशांत बोडके, डॉ. अनिल ढाके, डॉ. के. बी. पाटील आदी.
------
संशोधनासह विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक संधींना मिळणार चालना
उपशीर्षक
महात्मा फुले कृषी विद्यापीठ- जैन इरिगेशन यांच्यात सामंजस्य करार
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ६ : संशोधन, शिक्षण, विस्तार आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व संशोधन क्षमतांना चालना देण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ (राहुरी) आणि जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेड यांच्यात नुकताच सामंजस्य करार झाला.
कुलगुरू डॉ. विलास खर्चे, जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.
महात्मा फुले कृषी विद्यापीठचे संशोधन संचालक डॉ. प्रशांत बोडके आणि जैन इरिगेशनचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल ढाके यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. अखिल भारतीय समन्वित जलसिंचन व पाणी व्यवस्थापन संशोधन प्रकल्पाचे डॉ. अभय पाटील, जैन इरिगेशनचे आंतरराष्ट्रीय केळी तज्ज्ञ डॉ. के. बी. पाटील, डॉ. बाळकृष्ण, जळगावचे तीळ पैदासकार डॉ. सुरेंद्रसिंग राजपूत, जळगाव कृषी विद्यालयाचे प्राचार्य डॉ. योगेश पाटील उपस्थित होते.
या करारांतर्गत आधुनिक सूक्ष्म सिंचन, सिंचनाचे स्वयंचलित प्रणाली, कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित काटेकोर सिंचन, सिंचनाद्वारे विद्राव्य खतांचा कार्यक्षम वापर आणि भूपृष्ठाखालील ठिबक सिंचन या विषयांवर संयुक्त संशोधन प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. विविध प्रमुख पिकांसाठी सिंचनाचे वेळापत्रक, पाण्याचा काटेकोर वापर, सिंचनाद्वारे खत व्यवस्थापन आणि एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापनासंबंधी पीकनिहाय प्रमाणित कार्यपद्धती विकसित करण्यात येतील. त्यात ड्रोनद्वारे फवारणी, इंटरनेट ऑफ थिंग्ज अर्थात आयओटी सेन्सर्स आणि उपग्रह प्रतिमांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश असेल.
करारामुळे संशोधनास चालना
विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष औद्योगिक अनुभव आणि संशोधनाच्या संधी देण्यावरही करारात भर दिला आहे. विद्यापीठातील कृषी व कृषी अभियांत्रिकी शाखांच्या पदवी विद्यार्थ्यांना जैन इरिगेशनच्या उत्पादन प्रकल्पांमध्ये आणि संशोधन प्रक्षेत्रांवर प्रत्यक्ष औद्योगिक प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
शिष्यवृत्तीचीही संधी
कृषी क्षेत्रातील महत्त्वाच्या समस्यांवर संशोधन करणाऱ्या निवडक पदव्युत्तर आणि आचार्य पदवीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अथवा संशोधन साहित्याच्या खर्चासाठी आर्थिक सहाय्य देण्याची तरतूद आहे.