YEO26B27028
येवला : तहसील कार्यालयात लोक अदालतीत सहभागी अधिकारी, वकील व नागरिक.
----------------
येवल्यात महसूल अदालतीत
चार प्रकरणी जागेवर निपटारा
---------
तहसीलमध्ये महात्मा फुले लोकअदालत
-------------
सकाळ वृत्तसेवा
येवला, ता.६ : सामान्य जनतेच्या मूलभूत समस्या सोडविणे, महसूल विभाग अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व पारदर्शक करण्यासाठी तहसील कार्यालयात महात्मा जोतीराव फुले महसूल लोक अदालतीचे येथे आयोजन करण्यात आले. यात चार प्रकरणांचा जागेवरच निपटारा करण्यात आला.
या अदालतीमध्ये तालुक्यातील वहिवाटी रस्त्यांचे वाद तडजोडीने आणि समन्वयाने मिटवण्यावर मुख्य भर देण्यात आला. या अभियानाचे उद्घाटन उपविभागीय अधिकारी बाबासाहेब गाढवे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. तहसीलदार आबा महाजन यांनी उपस्थित पक्षकारांना महसूल लोक अदालतीचे महत्त्व पटवून देत मार्गदर्शन केले. या उपक्रमात बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. प्रकाश गायकवाड, चिटणीस सचिन गायकवाड आणि तालुक्यातील इतर सर्व विधिज्ञांचे सहकार्य लाभले.
या अदालतीसमोर एकूण ४२ प्रकरणे ठेवण्यात आली होती. संबंधित पक्षकार आणि त्यांच्या वकिलांमध्ये झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर ४ प्रकरणांमधील वाद परस्परांच्या समजुतीने आणि समन्वयाने यशस्वीरीत्या मिटवण्यात आले. विशेष म्हणजे, या ४ प्रकरणांचे आदेश त्याच दिवशी तात्काळ पारित करण्यात आले. उर्वरित प्रकरणे अंतिम आदेशासाठी बंद करण्यात आली आहेत.
नागरिकांच्या अर्धन्यायीक प्रकरणांचा जलद गतीने आणि आपसातील सहमतीने निपटारा व्हावा, जेणेकरून जनतेचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचेल, हाच या विशेष अभियानाचा मुख्य उद्देश असल्याचे तहसीलदार आबा महाजन यांनी सांगितले.
----------------