फोटो - NSK26H33675
डीजीपी नगर : महात्मा फुले समाज शिक्षण संस्थेच्या सभेत मार्गदर्शन करताना संस्थेचे अध्यक्ष भाऊराव बच्छाव यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी व संचालक.
महात्मा फुले समाज शिक्षण
संस्थेची वार्षिक सभा शांततेत
-----------------------
विविध विषय बहुमताने मंजूर
सकाळ वृत्तसेवा
डीजीपी नगर, ता. २७ : क्रांतिसूर्य महात्मा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या ज्ञानाचा समृद्ध वारसा जपणारी व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय करून देणारी पखाल रोडवरील महात्मा फुले समाज शिक्षण संस्थेची ३८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शांततेत पार पडली. या वेळी विविध विषय बहुमताने मंजूर करण्यात आले.
सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष भाऊराव बच्छाव तसेच कार्याध्यक्ष डी. डी. खैरनार, सरचिटणीस पुरुषोत्तम फुलसुंदर, चिटणीस सुनीता खैरनार, खजिनदार बाळासाहेब पुंड, शिक्षणाधिकारी मधुकर बच्छाव यांसह संचालक मंडळ उपस्थित होते. प्रारंभी क्रांतिसूर्य महात्मा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. सभेचे वार्षिक इतिवृत्त, संस्थेचा वार्षिक अहवाल, एकत्रित खर्च उत्पन्न पत्रक, ताळेबंद पत्रक, अंदाजपत्रक व संस्थेच्या वाढ विकासासाठी करावयाचे प्रयत्न देणगी व निधी जमा करण्यासाठी करावयाच्या उपाययोजना हे सर्व विषय बहुमताने मंजूर करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष भाऊराव बच्छाव यांनी संस्थेच्या वाढ व विकासासाठी सामूहिक प्रयत्नाची गरज असून संस्था वाढीसाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन केले. या वेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवलेल्या मान्यवरांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन संचालक सुधाकर जाधव यांनी तर आभार संचालक माधवराव मोरे यांनी मानले. सभेस सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.