महाविकास आघाडीकडून मोटबांधणी सुरू
--------
जिल्हा बँक निवडणुकीबाबत चार पक्षाच्या नेत्यांची पत्रकार परिषद
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता.२५ : येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जाण्याची भूमिका घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष, काँग्रेस व शेतकरी संघटना या चार घटकांनी एकत्र येत निवडणुकीच्या रणनीतीबाबत भूमिका मांडली. इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल करावेत. अर्जांची छाननी झाल्यानंतर सर्व उमेदवारांशी चर्चा करून पॅनेल निश्चित करण्यात येईल, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.
येथील पद्मालय या शासकीय विश्रामगृहात रविवारी (ता.२५) झालेल्या या पत्रकार परिषदेला चारही पक्षांचे जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यात प्रमोद पाटील, गुलाबराव वाघ, भूषण पाटील, एजाज मलिक, अशोक लाडवांजरी, योगीराज पाटील, अन्वर खाटीक आदींचा समावेश होता.
......
इच्छुकांना अर्ज भरण्याचे आवाहन
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सर्व समविचारी पक्ष व सहकार क्षेत्रातील कार्यकर्त्यांना सोबत घेण्याचा प्रयत्न असल्याचे यावेळी सांगण्यात आले. आघाडीबाहेरील काही इच्छुक उमेदवारांनीही संपर्क साधला आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर व अर्जांच्या छाननीची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर संबंधित उमेदवारांशी चर्चा करून पुढील रणनीती ठरविण्यात येणार आहे. सर्व उमेदवारांना विश्वासात घेऊन एकत्रित पॅनेल उभे करण्याच्यादृष्टीने प्रयत्न केले जाणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
.......
शेतकरीहिताला प्राधान्य
जिल्हा बँक ही शेतकऱ्यांच्या आर्थिक व्यवहाराच्यादृष्टीने महत्त्वाची संस्था आहे. त्यामुळे बँकेचा कारभार शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देणारा असावा, अशी भूमिका पत्रकार परिषदेत मांडण्यात आली. शेतकऱ्यांची बँक शेतकऱ्यांसाठीच चालली पाहिजे, या भूमिकेतून निवडणुकीत एकत्रितपणे लढा देण्याचे आवाहन करण्यात आले. चारही पक्षांनी एकत्र येत निवडणुकीची तयारी सुरू केल्याने जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील राजकीय समीकरणांकडे सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.