जिल्ह्यात महाविकास आघाडीची आगेकूच! ३० ते ३५ ग्रामपंचायतींत सत्ता काबीज

Mahavikas-Aghadi.jpg
Mahavikas-Aghadi.jpg

नाशिक : जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत सोमवारी (ता. १८) राज्यातील महाविकास आघाडीने बाजी मारली. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना सत्तेत अग्रभागी राहिली असून, काँग्रेसने देखील सत्तेत वाटा मिळविला. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांना ‘होमपीच’ शिवडी (ता. निफाड) येथील सत्ता गमवावी लागली. पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या येवला तालुक्यात शिवसेनेसोबत राष्ट्रवादीने यश मिळविले. 

सत्तेच्या अपक्षांच्या हातात चाव्या

चांदवडचे माजी आमदार उत्तमबाबा भालेराव यांच्या वडनेरभैरव (ता. चांदवड) येथील सत्तेच्या अपक्षांच्या हातात चाव्या गेल्या. नांदगावमध्ये शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांच्या समर्थकांनी ५४ पैकी ४४ जागी सत्ता मिळविली असली, तरीही काँग्रेसचे माजी आमदार ॲड. अनिल आहेरांनी न्यायडोंगरीमध्ये आपले वर्चस्व पुन्हा प्रस्थापित केले. तरुणाईच्या सरशीचे जिल्हाभर चित्र पाहावयास मिळालेले असताना नाशिक तालुका त्यास अपवाद राहिला नाही. २२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत शिवसेनेचा नाशिक तालुक्यात प्रभाव राहिला. मात्र शिंदे, पळसे, सिद्ध पिंप्री, जाखोरी, माडसांगवी, शिलापूर, ओढा ग्रामपंचायतीत सत्ताधारी गटांना हादरा बसला. कळवणध्ये महाविकास आघाडीने करिश्‍मा सिद्ध केलेला असताना राष्ट्रवादीचे आमदार नितीन पवार यांच्या समर्थकांनी सत्तास्थान मिळविले. 

३० ते ३५ ग्रामपंचायतींमध्ये महाविकास आघाडीचे यश

अभोण्याच्या माजी सरपंचांचा दोन वॉर्डमध्ये पराभव झाला असून, त्यांचा एका वॉर्डमध्ये एका मताने विजय झाला. नांदगावमध्ये काँग्रेसने दहा, तर राष्ट्रवादीने एका ग्रामपंचायतीत यश मिळविले. भाजपचे अकरा सदस्य निवडून आलेत. जिल्हा परिषदेचे सदस्य रमेश बोरसे आणि महेंद्र बोरसे यांच्या साकोरा ग्रामपंचायतीच्या रस्सीखेचमध्ये राष्ट्रवादीचे अतुल पाटील यांचे समर्थन निर्णायक ठरणार आहे. चांदवडमध्ये ५२ पैकी ३० ते ३५ ग्रामपंचायतींमध्ये महाविकास आघाडीने यश मिळविले. जिल्हा परिषदेतील भाजपचे गटनेते डॉ. आत्माराम कुंभार्डे आणि शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी सत्तेत स्थान मिळविले. बागलाणमध्ये महाविकास आघाडीने यश मिळविले. लखमापूर ग्रामपंचायतीवर भगवा फडकला आहे. भाजपचे डॉ. विलास बच्छाव यांच्या गटाला एका जागेवर समाधान मानावे लागले. नामपूरला सत्तेच्या चाव्या अपक्षांकडे राहतील. 

पिंपळगावत मात्र राष्ट्रवादीला सत्ता गमवावी लागली...

इगतपुरीमध्ये शिवसेनेने मुसंडी मारली. दिंडोरीमध्ये ५७ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी आणि शिवसेनेने एकमेकांच्या ग्रामपंचायती खेचल्या आहेत. ओझरमध्ये जिल्हा परिषदेचे सदस्य यतीन कदम यांनी बाजी मारली. लासलगावमध्ये जयदत्त होळकर आणि नानासाहेब पाटील यांच्या गटाने बहुमत मिळविले. उगावला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राजाराम पानगव्हाणे यांनी विश्‍वास मिळवला. वनसगावला काँग्रेसने, तर कोठुरेला राष्ट्रवादीचे राजेंद्र डोळखे यांनी यश मिळवले. पिंपळगाव परिसरात मात्र राष्ट्रवादीला सत्ता गमवावी लागली. सिन्नरमध्ये राष्ट्रवादीचे आमदार ॲड. माणिकराव कोकाटे आणि माजी आमदार राजाभाऊ पानगव्हाणे यांच्या गटाने वर्चस्व ठेवले आहे. देवळ्यात काँग्रेसचे माजी आमदार शिरीष कोतवाल यांच्या समर्थकांनी बाजी मारत असताना महाविकास आघाडीने यश मिळविले. भाजपचे आमदार डॉ. राहुल आहेर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष केदा आहेर यांच्या समर्थकांनीसुद्धा यश मिळविले आहे. त्र्यंबकेश्‍वरमधील तीन ग्रामपंचायतीत काँग्रेसने यश मिळविले. 

मालेगावमध्ये शिवसेनेचा बोलबाला

शिवसेनेचे कृषिमंत्री दादा भुसे यांच्यामुळे मालेगावमधील ९६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत शिवसेनेचा बोलबाला राहिला. त्याचवेळी अद्वय हिरे यांच्या समर्थकांनी देखील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत यश मिळविले आहे. ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत आजी- माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. बागलाणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दीपिका चव्हाण आणि संजय चव्हाण यांच्या समर्थकांनी घवघवीत यश मिळवले असून, जिल्हा परिषदेचे माजी सभापती यतीन पगार यांच्या समर्थकांना पराभवाला सामोरे जावे लागले. निफाडमध्ये राष्ट्रवादीचे आमदार दिलीप बनकर आणि शिवसेनेचे माजी आमदार अनिल कदम यांच्या समर्थकांनी बाजी मारली. दिंडोरीमध्ये विधानसभेचे राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ आणि शिवसेनेचे माजी आमदार धनराज महाले यांच्या समर्थकांमधील लढत उत्कंठावर्धक ठरली होती.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com