फोटो क्रमांक : 33574
धुळे : ‘महावितरण’च्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी झालेल्या निवड चाचणीदरम्यान कुस्ती प्रकारातील खेळाडूंची ओळख करून घेताना दिलीप जगदाळे. शेजारी आय. ए. मुलाणी, पवनकुमार कछोट, संजय सरग आदी.
---
महावितरण क्रीडा स्पर्धेसाठी १६० जणांची निवड
--
धुळ्यात निवड चाचणी स्पर्धा ; कोल्हापूरला राज्यस्तरीय स्पर्धा
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. २६ : ‘महावितरण’च्या २०२६-२७ च्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी जळगाव आणि नाशिक परिमंडलाचा संघ निवडण्याची प्रक्रिया धुळे येथील जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर शनिवारी (ता. २४) पार पडली. या निवड चाचणीत चारशेहून अधिक कर्मचारी-खेळाडूंनी सहभाग नोंदविला. त्यातून १६० पुरुष व महिला कर्मचाऱ्यांची आगामी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. हा संघ नोव्हेंबरमध्ये कोल्हापूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत सहभागी होईल.
कोकण प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक दिलीप जगदाळे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. जळगाव परिमंडलाचे मुख्य अभियंता आय. ए. मुलाणी, नाशिक येथील नेटवर्क प्लॅनिंग सेलचे मुख्य अभियंता पवनकुमार कछोट, धुळे मंडलाचे अधीक्षक अभियंता संजय सरग उपस्थित होते.
सहव्यवस्थापकीय संचालक जगदाळे म्हणाले, की क्रीडा स्पर्धांमुळे कर्मचाऱ्यांमध्ये संघभावना, शिस्त आणि खिलाडूवृत्ती विकसित होते. दैनंदिन कामाच्या धावपळीत अशा स्पर्धा कर्मचाऱ्यांना शारीरिक व मानसिक तंदुरुस्ती राखण्यासाठी आणि नव्या ऊर्जेने कार्यरत राहण्यासाठी प्रेरणा देतात. मुख्य अभियंता मुलाणी म्हणाले, की ‘महावितरण’च्या कर्मचाऱ्यांनी वीजसेवेचे कर्तव्य बजावताना आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. क्रीडा स्पर्धांमुळे कर्मचाऱ्यांमधील सुप्त गुणांना वाव मिळून सांघिक कार्यक्षमता बळकट होते.
२५ क्रीडा प्रकारांचा समावेश
निवड चाचणीत कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, बॅडमिंटन, टेबल टेनिस, बुद्धिबळ, कॅरम, टेनिकॉइट, ब्रीज, कुस्ती, धावणे (१००, २००, ४००, ८००, १५००, ५००० मीटर), ४ बाय १०० मीटर रिले, उंचउडी, लांबउडी, गोळाफेक, थाळीफेक, भालाफेक आणि क्रिकेट, अशा २५ इनडोअर व आऊटडोअर प्रकारांचा समावेश होता. नाशिक परिमंडलाचे उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी विश्वास पाटील, जनसंपर्क अधिकारी विकास आढे, जळगाव परिमंडलाचे उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी अरुण शेलकर, वरिष्ठ व्यवस्थापक अमित सोनवणे, धुळे मंडलाचे कार्यकारी अभियंता प्रताप मचिये, जितेंद्र महाजन, प्रीतम काळे, भाऊसाहेब पाटील, व्यवस्थापक नरेश प्रसाद, अक्षय पाडसवान यांच्यासह इतर अधिकारी व क्रीडा नियोजन समितीचे सदस्य उपस्थित होते.