महावितरणच्या राज्यस्तरीय क्रीडा
स्पर्धेत १६० कर्मचाऱ्यांची निवड
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. २५ : महावितरण कंपनीच्या २०२६-२७मधील राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी जळगाव-नाशिक परिमंडलाचा संघ शनिवारी (ता.२४) निवडण्यात आला. या निवड चाचणीत चारशेहून अधिक कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. त्यातील १६० कर्मचाऱ्यांची कोल्हापूर येथे नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.
धुळे येथील जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर कोकण प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक दिलीप जगदाळे यांच्या हस्ते निवड चाचणी स्पर्धांचे उद्घाटन झाले. यावेळी जळगाव परिमंडलाचे मुख्य अभियंता आय. ए. मुलाणी, नाशिक येथील नेटवर्क प्लॅनिंग सेलचे मुख्य अभियंता पवनकुमार कछोट, धुळे मंडलाचे अधीक्षक अभियंता संजय सरग यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, बॅडमिंटन, टेबल टेनिस, बुद्धिबळ, कॅरम, टेनिकॉइट, ब्रीज, कुस्ती, धावणे (१०० मीटर, २०० मीटर, ४०० मीटर, ८०० मीटर, १५०० मीटर, ५००० मीटर), ४ बाय १०० मीटर रिले, उंच उडी, लांब उडी, गोळा फेक, थाळी फेक व भाला फेक, क्रिकेट आदी इनडोअर व आऊटडोअर स्वरूपातील वैयक्तिक व सांघिक अशा २५ क्रीडा प्रकारांची चाचणी घेण्यात आली. सर्व क्रीडा प्रकारांच्या चाचणी चारशेहून अधिक कर्मचारी सहभागी झाले. त्यातून १६० पुरुष व महिला कर्मचाऱ्यांची स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.