NSK26H34621
मालदाभाडी : शेतातील गांजाची झाडे उपटताना पोलिस.
---
शेतात गांजाची लागवड; जामनेर पोलिसांचा छापा
---
मालदाभाडीत १३ किलो ४३० ग्रॅम गांजा जप्त; ३ लाख ३५ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ६ : आर्थिक फायद्यासाठी शेतातच गांजाची लागवड करून त्याची चोरटी विक्री करण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतमालकावर जामनेर पोलिसांनी कारवाई केली. मालदाभाडी (ता. जामनेर) येथे गुरुवारी (ता. ५) दुपारी केलेल्या छाप्यात पोलिसांनी गांजाची १३ किलो ४३० ग्रॅम वजनाची झाडे मुळांसह जप्त केली. या गांजाची अंदाजे किंमत तीन लाख ३५ हजार ७५० रुपये आहे. या प्रकरणी अनिल दगडू पाटील (रा. मालदाभाडी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
जामनेर पोलिसांना गुरुवारी मालदाभाडीतील एका शेतात गांजाची बेकायदा लागवड केल्याची माहिती मिळाली. त्यावरून पोलिसांनी दुपारी सव्वादोनला संबंधित शेतात छापा टाकला. अनिल पाटील याच्या शेतात प्रतिबंधित गांजाची झाडे आढळून आली. पोलिसांनी ही झाडे मुळांसह उपटून ताब्यात घेतली. त्यांचे एकूण वजन १३ किलो ४३० ग्रॅम भरले. संशयिताने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी, तसेच गांजाची चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने ही लागवड केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक निवृत्ती बोऱ्हाडे, उपनिरीक्षक अशोक कोकाटे, कृष्णा सोळुंके, ग्रेड उपनिरीक्षक जयसिंग राठोड, साहिल तडवी, उमेश चौधरी, राजू तायडे, चंद्रकांत पाटील, योगेश पाटील, विशाल लाड, ज्ञानेश्वर देशमुख, राजेश लहासे आणि चालक ज्ञानेश्वर बडगुजर यांनी केली.