16213
मालेगाव : अतिक्रमण निर्मुलन विभागाने जप्त केलेल्या दुचाकी
-----
मालेगावला अतिक्रमण हटाव मोहिम
रस्त्यावरील दुचाकींसह इतर साहित्य जप्त
सकाळ वृत्तसेवा
मालेगाव कॅम्प, ता. ६ : शहरात दिवाळी सणानिमित्त बाजारपेठेत खरेदीसाठी होत असलेल्या गर्दीने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती. काही नागरीक वाहने रस्त्यावरच उभी करीत असल्याने वाहतुक कोंडीत भर पडत आहे. मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन पथक व आयेशानगर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत रस्त्यावरील ९ दुचाकी व साहित्य जप्त केले
शहरात दोन दिवसांपूर्वी किदवाई रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यात आले होते. वाहतूक कोंडी दूर व्हावी यासाठी महापालिका आयुक्त भाग्यश्री विसपुते यांच्या आदेशानुसार अतिक्रमण निर्मुलन विभागाने गुरुवारी (ता. ५) जुना आग्रा रोड, सुपर मार्केट जवळ रस्त्याला लागून उभ्या केलेल्या नऊ दुचाकी, चार लोखंडी स्टूल, होडिंग बॅनर व इतर साहित्य जप्त करून आयेशानगर पोलिस ठाण्यात जमा करण्यात आले. या कारवाईने जुना आग्रा रस्त्यावरील वाहतूक सुरळीत झाली आहे. उपायुक्त सुनीता कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त बाळू धोंडगे, प्रभाग अधिकारी संतोष गायकवाड, अतिक्रमण अधीक्षक प्रवीण पवार, आयेशानगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रतापसिंग बहुरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी कारवाई केली. पुन्हा रस्त्यावर अतिक्रमण केल्यास दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा महापालिका आयुक्त भाग्यश्री विसपुते यांनी दिला आहे.