मालेगावातील लाचप्रकरण--लोगो
--------------
लाचखोर आयुक्तापेक्षा ‘पीए’च्या घरी मोठे घबाड
----------
स्थावर मालमत्तेची महत्त्वाची कागदपत्रे जप्त : बँक लॉकरचा शोध सुरू
-----------
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ३० : मालेगाव महापालिकेचा आयुक्त रवींद्र जाधव, त्याचा स्वीय सहायक नीलेश पाटील आणि लेखापाल हरीश डिंबर यांच्या घर झडतीमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या हाती मोठ्या प्रमाणात रोकड लागली आहे. विशेषतः आयुक्त जाधव याच्या दोन घरांच्या घरझडतीपेक्षा स्वीय सहायक पाटीलच्या घरात जास्त रोकड मिळाली आहे. दरम्यान, तिघा लाचखोरांच्या घरातून मोठ्या प्रमाणात स्थावर मालमत्तेची कागदपत्रे जप्त केली असून, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकांकडून संशयितांच्या बँक लॉकरचा शोध सुरू केला आहे.
....
ठेकेदारांच्या कामाच्या बिलांपोटी प्रत्येकी चार टक्क्यांप्रमाणे ८० हजारांच्या लाचेची मागणी आयुक्त जाधव, नीलेश पाटील, हरीश डिंबर यांनी केली होती. याप्रकरणी तक्रार प्राप्त होताच, नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकांनी जाधव, पाटील यांना घोटी येथे तर डिंबर यास मालेगावातून अटक केली होती. त्याचवेळी पथकांनी या तिघांच्या घरावर एकावेळी छापेमारी करीत घरझडती सुरू केली होती.
तिन्ही लाचखोरांच्या घरी सुमारे १२ ते १६ तास झडती सुरू होती. त्यात लाचखोर आयुक्त जाधव यांच्या छत्रपती संभाजीनगर येथील फ्लॅटमधून ११ लाख ८७ हजारांची रोकड तर, मालेगाव येथील शासकीय निवासस्थानातून ९ लाख ३८ हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. नीलेश पाटील याच्या घरझडतीतून ३१ लाख १५ हजारांची रोकड जप्त करण्यत आली आहे. लेखापाल डिंबर याच्या घरातून १३ लाखांच्या रोकड व ऐवजासह १५ लाख ७९ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. लाचखोरांच्या घरातून स्थावर मालमत्तेसंदर्भातील महत्त्वाची कागदपत्रेही जप्त करण्यात आली आहे. तिघांच्या बँक खात्याची माहिती घेण्यात आली असून, लॉकरचा शोध घेतला जात आहे. यासाठी संबंधित बँकांकडे ती गोठविण्यासंदर्भात पाठपुरावा केला जाणार आहे. तिन्ही संशयितांच्या पोलिस कोठडीची मुदत उद्या (ता.३१) संपत असल्याने मालेगाव न्यायालयात हजर केले जाणार आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक भारत तांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सचिन साळुंखे तपास करीत आहेत.
------------------