सोयगाव परिसरात
लॅपटॉप चोरी
मालेगाव : येथील सोयगाव नववसाहत भागातील किरणकुमार सजन पाटील (वय ४२, रा. मित्रनगर) यांचा ६ हजार रुपये किंमतीचा लॅपटॉप व ३ हजार रुपये रोख असा एकूण ९ हजार रुपयाचा ऐवज चोरट्यांनी चोरुन नेला. २५ ऑक्टोबरला सकाळी आठ ते सव्वादहाच्या दरम्यान मित्रनगर भागात हा प्रकार घडला. कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
--------
तळवाडे भागातून
दुचाकी लंपास
मालेगाव : तळवाडे (ता. मालेगाव) येथील भगवान केदा सोनवणे (वय ३२) यांची ४० हजाराची दुचाकी (एमएच ४१ एडी ७७२३) चोरट्यांनी चोरुन नेली. २७ ऑक्टोबरला रात्री नऊला सटाणा नाका भागातील संकल्प हॉस्पीटलजवळ उभी केलेली दुचाकी चोरट्यांनी लंपास केली. छावणी पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
-----
जाजुवाडी भागात
दोघांना मारहाण
मालेगाव : येथील भायगाव रस्त्यावरील जाजुवाडी शिवारात गणपती मंदिराजवळ मागील भांडणाची कुरापत काढून दोघा मित्रांना तिघांनी मारहाण करण्याचा प्रकार घडला. संतोष रामदास पाटील (वय ४३, रा. भायगाव, जाजुवाडी) यांचा मुलगा मोहित व त्याचा मित्र यश क्रिकेट खेळत होते. मागील भांडणाची कुरापत काढून तेथेच राहणाऱ्या गौरव प्रदिप वाघ, सोहम पांडुरंग चव्हाण, दर्शन सुनिल चव्हाण यांनी दोघांना शिवीगाळ केली. सोहमने मोहितचे डोके भिंतीवर आपटून त्यास स्टीलच्या रॉडने मारहाण केली. यशला गौरव व दर्शनने लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन गळा आवळत स्टीलचे रॉडने मारहाण केली. तुम्ही जर पुन्हा गल्लीत परत आम्हाला दिसले तर तुम्हाला जीवे ठार मारु असा दम दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. १ नोव्हेंबरला सायंकाळी साडेसहाला हा प्रकार घडला. वडनेर खाकुर्डी पोलिस ठाण्यात तिघांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.
----
कळवाडी भागात
अपघातात एक ठार
मालेगाव : कळवाडी (ता. मालेगाव) येथील द्वारका बंगल्याजवळ तवेरा गाडीच्या धडकेने ॲपे रिक्षातील एक ठार तर चौघे जखमी झाले. तवेराने (एमएच ४३ एन ७६१८) समोरुन येणाऱ्या ॲपेरिक्षाला (एमएच १९ -एक्स ९०७) जबर धडक दिली. अपघातात ॲपेरिक्षा पलटी होवून शेखर मनोहर अहिरे (वय ३४, रा. कळवाडी) हा तरुण गंभीर जखमी होवून त्याचा मृत्यू झाला. रिक्षातील रोशन संजय पडोळकर, कुणाल अजय पडोळकर, गोपाळ आण्णा पवार, मंगेश महादु चव्हण (सर्व रा. कळवाडी) हे जखमी झाले. तालुका पोलिस ठाण्यात तवेरा चालकाविरुध्द (नाव, गाव माहित नाही) गुन्हा दाखल झाला आहे.