मेन
दिवाळी खरेदीसाठी मालेगावला बाजार फुलला
कपडे, आकाशकंदील, पणत्या, मिठाईला मागणी
सकाळ वृत्तसेवा
मालेगाव शहर, ता. ४ : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर मालेगाव शहरातील बाजारपेठा विविध वस्तूंनी सजल्या असून, खरेदीसाठी नागरिकांची लगबग सुरू झाली आहे. यंदा दुष्काळी परिस्थिती असली तरी दैनंदिन गरजेच्या वस्तूंसह दिवाळीचे साहित्य, कपडेलत्ते या खरेदीसाठी बाजारपेठ फुलली आहे. मालेगाव
परिसरात बाजारात ग्राहकांच्या गर्दीमुळे दिवाळीची चाहूल लागली आहे.
दिवाळी सुट्टी लागल्याने बच्चे कंपनीसह खरेदीकडे कल दिसून येतो. नोकर वर्गही वेतनाची वाट बघत असुन येत्या दोन दिवसांत मोठ्या प्रमाणावर खरेदीसाठी गर्दी होईल असे व्यापारी वर्गाने सांगितले.शहरातील प्रमुख बाजारपेठांसह विविध व्यावसायिक प्रतिष्ठानांमध्ये दिवाळीच्या वस्तूंची आकर्षक मांडणी करण्यात आली आहे. सणासाठी आवश्यक साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिक बाजारपेठांकडे वळू लागले आहेत.
नवीन कपडे, आकाशकंदील, पणत्या, रांगोळी, फराळ आणि मिठाई यांना विशेष महत्त्व असते. यंदाही या वस्तूंनी बाजारपेठा गजबजल्या आहेत. विविध रंगांचे आकाशकंदील, आकर्षक विद्युत रोषणाई, मातीच्या पणत्या, रांगोळीचे रंग आणि सजावटीच्या वस्तूंनी दुकानांचे रूप पालटले आहे. दिवाळीच्या खरेदीसाठी कपड्यांच्या दुकानांमध्येही विविध प्रकारचे पोशाख उपलब्ध झाले आहेत. लहान मुलांचे कपडे, महिलांचे सणासुदीचे पोशाख तसेच पुरुषांचे पारंपरिक कपडे खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. मिठाई आणि फराळाच्या दुकानांमध्येही विविध पदार्थांची तयारी सुरू असून, सणाच्या पार्श्वभूमीवर व्यावसायिकांनी दुकानांची सजावट केली आहे.
दिवाळी हा व्यापारी वर्गासाठी महत्त्वाचा सण मानला जातो. सणाच्या खरेदीमुळे बाजारपेठेत आर्थिक उलाढाल वाढण्याची अपेक्षा व्यापाऱ्यांना आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी दुकानांमध्ये विविध वस्तूंची मांडणी करण्यात आली असून, काही ठिकाणी आकर्षक सजावटही करण्यात आली आहे.
दिवाळीच्या खरेदीसाठी नागरिकांची गर्दी वाढत असताना बाजारपेठांमध्ये वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांना वाहनतळाची सुविधा उपलब्ध करून देण्यासह वाहतूक व्यवस्थेचे नियोजन करण्याची गरज व्यक्त होत आहे. सणाच्या उत्साहात मालेगावची बाजारपेठ दिवाळीच्या रंगात रंगायला सुरू झाली आहे.
नवे रेडीमेड दालन व ऑफर्स
शहरातील नामांकित ब्रॅण्डेड कपड्यांचे दालन यंदा सुसज्ज झाले आहेत. यात बिग बझार, झुडीओ, महाराष्ट्र कलेक्शन किड्स वेअर यांच्यासह अनेक नव्या रेडिमेड छोट्या मोठ्या व्यवसायिक यांची भर पडली असून खरेदीवर विविध ऑफर्स देण्यात येत आहेत. जुन्याही अनेक दालनांनी परंपरागत ग्राहक टीकवून ठेवला असून दिवाळी सणासाठी सज्ज आहेत.
------------
मालेगाव शहर : दिवाळीच्या स्वागतासाठी फुललेला बाजार.