चित्र दुष्काळाचे/ मालेगाव
---------------------
फोटो -NSK26H32147
मालेगाव : डोंगराळे येथे पिकाची पाहणी करताना मंत्री दादा भुसे.
पाणी, चारा, रोजगारासाठी आताच कृती आराखडा हवा!
----------------------------------------------
पंचनामे करून भरीव मदत, टंचाईग्रस्त गावांसाठी टँकरच्या नियोजनाची अपेक्षा
गोकूळ खैरनार : सकाळ वृत्तसेवा
मालेगाव, ता. १२ : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पिण्याचे पाणी, शेती, पशुधन आणि रोजगाराचे संकट गडद होण्यापूर्वीच प्रशासनाने ठोस पावले उचलण्याची गरज आहे. पीक पंचनामे पूर्ण करून शेतकऱ्यांना भरीव मदत, टंचाईग्रस्त गावांसाठी टँकरचे नियोजन, चारा छावण्या, रोजगार हमीच्या कामांना गती आणि धरणांतील पाणीसाठ्याचे काटेकोर नियोजन करून दुष्काळाचा मुकाबला करण्यासाठी सर्वंकष कृती आराखडा तयार करावा, अशी अपेक्षा शेतकरीवर्गातून व्यक्त होत आहेत.
मालेगाव तालुक्यात रब्बी हंगाम देखील वाया जाण्याची चिन्हे दिसत आहेत. विशेषतः उन्हाळी कांदा लागवड व उत्पादनावर त्याचा परिणाम होऊ शकेल. या वर्षी जून ते ऑगस्ट या तीन महिन्यात २७२.१ मिलिमीटर पाऊस झाला. सप्टेंबर महिन्यात केवळ १५.३ मिलिमीटर एवढाच पाऊस नोंदला गेला. तालुक्यात मक्याचे सर्वाधिक ५८ हजार ५७३ क्षेत्र असून १३२ टक्के पेरणी झाली होती. सुरुवातीच्या काळात मका, बाजरी व कपाशी ही पिके जोमात होती. पाऊस रुसल्याने पिकांची वाढ खुंटली. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी पिकांमध्ये जनावरे सोडली. तर काही ठिकाणी अर्धवट आलेल्या पिकांवर नांगर फिरविण्याची वेळ बळीराजावर आली. जवळपास ५० ते ६० टक्के खरीपाच्या उत्पन्नात घट झाली.
काटवन व माळमाथ्याला फटका
पूरपाण्यामुळे गिरणा डावा व उजवा कालवा काही दिवस वाहत राहिल्याने लाभ क्षेत्रातील पिके काही प्रमाणात आली. तालुक्यासह माळमाथा व काटवन भागात कपाशी व मक्याचे ७० टक्क्यापेक्षा अधिक नुकसान झाले. तालुक्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान ४५७ मिलिमीटर आहे. जेमतेम निम्मा देखील पाऊस झाला नाही. माळमाथा परिसरात जून महिन्यात ५९.२ टक्के इतकी पावसाने हजेरी लावली परंतु सप्टेंबर महिन्यात हीच टक्केवारी १३.१७ एवढी झाल्याने पन्नासपेक्षा अधिक गावातील पिके करपली. या भागात अनेक गावांमध्ये पाणीटंचाई जाणवू लागली आहे. गिरणा व मोसम नदीकाठच्या गावांना पूरपाण्यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
चारा टंचाई सदृश परिस्थिती
तालुक्यात पशुधनाची संख्या पाहता चारा टंचाईचा प्रश्न प्रामुख्याने उन्हाळ्यात गंभीर होऊ शकतो. तालुक्यातील ७० टक्के शेतकरी शेतमळ्यांमध्ये राहतात. गाय, म्हैस या दुभत्या जनावरांना महिना भरासाठीच काही भागात हिरवा चारा पुरेल अशी परिस्थिती आहे. शेळ्या, मेंढ्या व इतर जनावरांसाठी जेमतेम दिवाळीपर्यंत चारा व पाणी उपलब्ध असेल. दिवाळीनंतर तसेच उन्हाळ्यात पशुधन जगवण्यासाठी शासन स्तरावर छावणीच्या माध्यमातून सुका, कुट्टी, कडबा चाऱ्याची उपलब्धता करणे आवश्यक आहे. शहर व परिसरात अनेक गोशाळा आहेत. या गोशाळांना देखील आधार दिला पाहिजे.
------
वार्षिक सरासरी पर्जन्यमान - ४५७ मिमी
२०२५ मधील पाऊस - ६०८.८ मिमी
२०२६ मधील पाऊस - २८७.८ मिमी
इन्फो...
तालुक्यातील पशुधन
गाय -७९ हजार ४६१
म्हैस - ३० हजार ३३९
वासरे/पारडू -१४ हजार ९७५
शेळी- ८६ हजार ६०१
मेंढी - ६३ हजार ८०४
एकूण - २,७५,१८०
-------
स्थानिक प्रशासनाकडून अपेक्षा
- तालुक्यात पिकांचे पंचनामे सुरु आहेत. ते तातडीने पूर्ण करून पात्र शेतकऱ्यांना दसऱ्यापूर्वी भरीव मदत मिळेल यासाठी प्रयत्न करावेत.
- मंडलनिहाय जलस्त्रोतांची सद्यःस्थिती तपासून संभाव्य टंचाईग्रस्त गाव, वाड्या, वस्त्या निश्चित करून टँकरने पाणीपुरवठ्याचे नियोजन तयार ठेवावे.
- पाणीटंचाईवर मात करण्यासाठी गावनिहाय विहिरी व जलस्रोत अधिग्रहण करण्यासाठी उपाययोजना कराव्यात.
- मजुरांचे स्थलांतर रोखण्यासाठी रोजगाराची मागणी करणाऱ्या प्रत्येकाला काम मिळावे. जलसंधारण व गाव पातळीवर रोजगार हमी योजनेची कामे सुरु करावीत.
- तालुक्यात जनावरांची संख्या पाहता चारा व पिण्याच्या पाण्याचे स्वतंत्र नियोजन करावे. जनावरांसाठी मंडलनिहाय किंवा पंचायत समिती गणनिहाय चारा छावण्यांचे नियोजन करावे.
- शेतकऱ्यांना घरपोच चारा वितरणाची यंत्रणा उभारावी.
- तालुक्यात किमान ५० ठिकाणी वन्य जिवांसाठी पाण्याची तळी उभारण्याची गरज आहे.
- दुष्काळी परिस्थिती हाताळण्यासाठी तहसील कार्यालयात स्वतंत्र कक्ष स्थापन करावा.
- चणकापूर, हरणबारी, केळझर, पुनंद व गिरणा धरणातील जलसाठ्यांचे नियोजन करावे. पिण्यासाठी ऑगस्टपर्यंत पाणी पुरेल असे नियोजन करावे.
- गिरणा धरणातील पाणी तालुक्यातील धरण क्षेत्रातील गावांना पिण्यासाठी व सिंचनासाठी उपलब्ध करून द्यावे.
- दुष्काळग्रस्त कुटुंबांना स्वस्त धान्य दुकानातून जादा धान्य व जीवनावश्यक वस्तू अल्प दरात मिळाव्यात.
-------
कोट...
पावसाअभावी खरीप हंगाम वाया गेला आहे. आगामी रब्बी हंगाम देखील येणार नाही. उन्हाळी कांदा लागवड करणे देखील शक्य होणार नाही. शासनाने जाहीर केलेल्या उपाययोजनांची तंतोतंत अंमलबजावणी करावी व दसऱ्यापूर्वी भरपाई देवून दिलासा द्यावा.
- सजन पवार, शेतकरी, रावळगाव (16075)
--------
कोट...
दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती अतिशय नाजूक आहे. शासनाने शेतकऱ्यांना भरीव नुकसान भरपाई द्यावी. तसेच शेतीसाठी विना व्याजी कर्जपुरवठा करून दिलासा द्यावा. जनावरांसाठी चारा छावण्या व पाणवठे उभारावेत.
- विमलबाई शेवाळे, शेतकरी, टेहरे (16076)