३६-३
मालेगावमध्ये साकारणार शहीद स्मारक
जिल्हा नियोजनामधून निधी; ओझरखेडला क्रांतिसूर्य बिरसा मुंडांचा पुतळा
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ६ ः जिल्हा प्रशासनातर्फे मालेगाव येथे शहीद स्मारक साकारण्यात येणार असून ओझरखेड धरण येथे पर्यटन सुविधा विकासासह स्वातंत्र्यसेनानी क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांचा पुतळा उभारण्यात येणार आहे. या दोन्ही महत्वाकांक्षी प्रकल्पांसाठी जिल्हा नियोजन समितीमधून प्रत्येकी चार कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी शुक्रवारी (ता.६) पत्रकार परिषदेत दिली.
राज्य सरकार व जागतिक बँकेतर्फे राबविण्यात येत असलेल्या महास्ट्राईड कार्यक्रमात नाशिक जिल्ह्याला आठ कोटींचे पारितोषिक मिळाले आहे. या निधीपैकी चार कोटींतून पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या निर्देशानुसार तसेच शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या संकल्पनेतून मालेगावला शहीद स्मारक उभे करण्यास प्रशासनाने मान्यता दिली आहे. या स्मारकात ३८ शहीद जवानांच्या प्रतिकृती साकारण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
ओझरखेड धरण हे जिल्ह्यातील पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे. जिल्हा नियोजनातंर्गत ४ कोटींतून धरण परिसरात पर्यटकांसाठी सुविधा उभारण्यात येतील. बिरसा मुंडा यांचा पुतळा बसविण्यात येणार आहे. स्वातंत्र्यलढ्यातील त्यांच्या योगदानाचा आणि आदिवासी समाजाच्या हक्क व प्रतिष्ठेसाठी त्यांनी केलेल्या कार्याचा हा सन्मान असेल. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जागेचा ताबा तसेच स्थळ मंजुरी मिळाल्यावर काम सुरु होईल. सदर कामांची अंमलबजावणी पालखेड पाटबंधारे विभागावर सोपविण्यात आली असून ऑगस्ट २०२७ पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी प्रसाद यांनी दिली.
---------------